प्रताप महाविद्यालयात “सर्जिकल स्ट्राइक: आवश्यकता व महत्व” व्याख्यान

धरणगाव/अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अमळनेर येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयात दिनांक 30 सप्टेंबर रोजी संरक्षण व सामरिकशास्त्र विभाग व राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान अर्थात रुसा यांच्या संयुक्त विद्यमाने “सर्जिकल स्ट्राइक: आवश्यकता व महत्त्व” या विषयावर अतिथी व्याख्यान संपन्न झाले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक संरक्षण व सामरिकशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ. रवींद्र मराठे यांनी केले. त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले की सर्जिकल स्ट्राइकचा नेमका उद्देश काय आहे? आणि त्याची उपयोगिता यावेळी विद्यार्थ्यांना पटवून दिली. समारंभाच्या अध्यक्षस्थानी करिअर कौन्सिलिंग सेंटरचे प्रमुख तथा महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. विजय तुंटे हे होते. त्यांनी दहशतवाद व सर्जिकल स्ट्राइक संबंधी माहिती देऊन यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

प्रमुख वक्ते म्हणून डॉ. उपेंद्र धगधगे (जी. टी. पाटील महाविद्यालय, नंदुरबार) हे संरक्षण व सामरिकशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत, त्यांनी यावेळी सर्जिकल स्ट्राइक संदर्भात सूक्ष्मपणे पीपीटीच्या माध्यमातून माहिती देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, सर्जिकल स्ट्राइक हे वैद्यकीय क्षेत्राच्या संदर्भात महत्त्वाचे आहे, असे असले तरी या संकल्पनेचा प्रयोग संरक्षणशास्त्र विषयात मोठ्या प्रमाणावर केला जातो. 18 सप्टेंबर 2016 रोजी जम्मू कश्मीर येथील उरी या ठिकाणी 19 भारतीय जवान झोपेत असताना जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने आपल्या जवानांची क्रूरपणे हत्या केली, तेव्हापासून सर्जिकल स्ट्राइक ही संकल्पना जागतिक पटलावर कार्यवाहीच्या स्वरूपामध्ये अभ्यासली जाते. सर्जिकल स्ट्राइक संदर्भात उरी हा चित्रपट देखील विशेष महत्त्वाचा होता. प्रमुख वक्त्यांनी यावेळी सर्जिकल स्ट्राइक मुळे कोणत्या प्रकारचे महत्त्व व धोके आढळतात आणि या संकल्पनेची व्याप्ती नेमकी कशी आहे? विविध मिशन टास्क काय आहेत? अशा कार्यवाहीत आपल्या सैनिकांची हानी न होता कृती कशा पद्धतीने करता येते? या संदर्भात सखोल असे मार्गदर्शन केले.

प्रमुख वक्त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकची उदाहरणे देऊन चर्चा केली. जून 2015 मध्ये म्यानमार या ठिकाणी तसेच सप्टेंबर 2016, ऑक्टोबर 2016, व फेब्रुवारी 2019 पाकिस्तान या ठिकाणी केलेल्या सर्जिकल स्ट्राइकची माहिती दिली. प्रस्तुत समारंभाचे प्रस्ताविक विभाग प्रमुख डॉ. रवींद्र मराठे यांनी केले तर प्रा. राहुल पाटील प्रा. विकास मोरे यांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. उषा मोरे यांनी केले तर आभार प्रा. राहुल पाटील यांनी मांडले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संरक्षण व सामरिकशास्त्र विभागातील विभाग प्रमुख, विभागातील प्राध्यापक, करियर कौन्सलिंग सेंटरचे सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Protected Content