यावल तालुक्यातील सरपंचपदाची आरक्षण सोडत २१ एप्रिल रोजी

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील ६७ ग्रामपंचायतींपैकी ६३ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठीची आरक्षण सोडत सोमवार, दिनांक २१ एप्रिल २०२५ रोजी काढण्यात येणार आहे. ही सोडत यावल येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली असून, सदर प्रक्रिया तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे.

यापूर्वी चार ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. उर्वरित ६३ ग्रामपंचायतींसाठी आरक्षण प्रक्रिया सोमवार रोजी पार पडणार आहे. यासाठी त्या-त्या ग्रामपंचायतीतील रहिवासी नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन महसूल प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

सदर आरक्षण प्रक्रियेत एकूण सरपंच पदांपैकी एक द्वितीयांश (सुमारे ५० टक्के) पदे महिलांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. यामध्ये अनुसूचित जाती (SC) महिला, अनुसूचित जमाती (ST) महिला, इतर मागासवर्गीय (OBC) महिला तसेच सर्वसाधारण महिलांचा समावेश आहे.

तपशीलवार आरक्षण आकडेवारी पुढीलप्रमाणे :

अनुसूचित जातीसाठी आरक्षित सरपंच पदे: ८

अनुसूचित जमातीसाठी आरक्षित सरपंच पदे: २१

इतर मागासवर्गीयांसाठी आरक्षित सरपंच पदे: २

सर्वसाधारण प्रवर्गासाठी सरपंच पदे: ३२

यातील महिलांसाठी आरक्षित पदांचे वर्गीकरण:

अनुसूचित जाती महिला: ४ | अनुसूचित जमाती महिला: ११ | इतर मागासवर्गीय महिला: १ | सर्वसाधारण महिला: १६

एकूण ६३ पैकी ३२ सरपंच पदे महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात येणार आहेत.

Protected Content