वादग्रस्त पोलीस अधिकारी रणजित कासले सेवेतून बडतर्फ

पुणे/बीड-वृत्तसेवा | बीडमधील वादग्रस्त पोलीस अधिकारी पीएसआय रणजित कासले याला शुक्रवारी पहाटे पुण्यातील स्वारगेट परिसरातील एका हॉटेलमधून अटक करण्यात आली. अटकेनंतर लगेचच छत्रपती संभाजीनगर विभागाच्या पोलीस महानिरीक्षकांनी त्याच्यावर सेवा समाप्तीची कारवाई करत बडतर्फीचे आदेश जारी केले.

काही दिवसांपूर्वी कासलेने माध्यमांशी बोलताना मोठे गौप्यस्फोट केले होते. त्याने सांगितले की, मसरजोगचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याच्या एन्काऊंटरसाठी त्याला ऑफर देण्यात आली होती. तसेच ईव्हीएममध्ये फेरफार करण्यासाठी दहा लाख रुपयांची ऑफर देण्यात आल्याचेही त्याने उघड केले होते.

या वक्तव्यांनंतर कासले फरार झाला होता. बीड पोलिसांनी मिळवलेल्या माहितीवरून तो पुण्यातील स्वारगेट परिसरातील एका हॉटेलमध्ये थांबलेला असल्याचे निष्पन्न झाले. गुरुवारी रात्री ११ वाजता कासले हॉटेलमध्ये दाखल झाला होता आणि सर्व नोंदणी प्रक्रिया पूर्ण करून खोली घेतली होती. पहाटेच्या सुमारास पोलिसांनी त्याच्या खोलीवर छापा टाकून त्याला ताब्यात घेतले, अशी माहिती हॉटेल कर्मचाऱ्यांनी दिली.

दरम्यान, त्याच्या अटकेनंतर पोलीस विभागाने त्वरीत निर्णय घेत त्याला सेवेतून बडतर्फ केल्याचे अधिकृत आदेश शुक्रवारी जाहीर करण्यात आले. या प्रकरणामुळे पोलीस प्रशासनातील अंतर्गत कार्यपद्धती, जवाबदारी आणि पारदर्शकतेबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Protected Content