ओंकार रितापुरे यास अ. भा. आंतरविद्यापीठ मिनी गोल्फ स्पर्धेत कांस्य पदक

सावदा, प्रतिनिधी – फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयाच्या बी.सी.ए. शाखेत शिक्षण घेत असलेला ओंकार आबासाहेब रितापुरे याने राजस्थानमधील झुनझुनू येथे श्री जगदिशप्रसाद झबरमल टिब्रेवाला विद्यापीठात झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ मिनी गोल्फ स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत कांस्य पदक पटकावले. त्याने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावचे प्रतिनिधित्व करत महाविद्यालयासह विद्यापीठाचे नाव उज्ज्वल केले आहे.

या यशाबद्दल ओंकारचे मधुस्नेह परिवाराचे प्रमुख, तापी परिसर विद्या मंडळाचे अध्यक्ष आणि माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांनी त्याचे तसेच महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. डॉ. गोविंद सदाशिवराव मारतळे यांचे विशेष अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. संस्थेच्या संचालक मंडळातील मान्यवरांनीही अभिनंदन करत उत्तुंग यशासाठी शुभेच्छा दिल्या.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. वाघूळदे यांनी ओंकारला विशेष सन्मान करून त्याच्या परिश्रमांचे कौतुक केले. यावेळी जिमखाना समितीचे चेअरमन प्रा. डॉ. ए. के. पाटील, बी.बी.ए. व बी.सी.ए. विभागप्रमुख डॉ. निखिल वायकोळे, प्रा. डॉ. पंकज सोनवणे यांच्यासह शारीरिक शिक्षण संचालक प्रा. डॉ. गोविंद सदाशिवराव मारतळे उपस्थित होते.

ओंकारच्या या घवघवीत यशाचे परिसरातील खेळाडूंनी, मित्र परिवार, नातेवाईक आणि महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी भरभरून अभिनंदन केले. याप्रसंगी ओंकारने भारताचे प्रतिनिधित्व करत आंतरराष्ट्रीय स्तरावरही पदक मिळवण्याचा मनोदय व्यक्त केला. त्याच्या यशामागे प्रा. डॉ. गोविंद मारतळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे त्याने नमूद केले.

Protected Content