
किनगाव (ता. यावल) – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील किनगाव येथे दसऱ्यानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनाच्या मार्गावरून वाद निर्माण झाल्याने परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. नियोजित मार्गावरील एका धार्मिक स्थळासमोरून पथसंचलन नेण्यास विरोध करण्यात आल्याने महिलांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरू केले. या घडामोडींनंतर वातावरण अधिक तापले आणि परिसरात तुरळक दगडफेक झाल्याची माहिती समोर आली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केल्याचे सांगण्यात येत असून परिस्थिती नियंत्रणात आहे, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह मोठा पोलीस फौजफाटा किनगावात दाखल झाला.

दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर किनगाव शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने पथसंचलनाची तयारी सुरू होती. या पथसंचलनासाठी निश्चित करण्यात आलेल्या मार्गावरून वादाची ठिणगी पडली. नियोजित मार्गावरील एका धार्मिक स्थळासमोरून पथसंचलन नेण्यास एका गटाने आक्षेप घेतल्याने वादाला सुरुवात झाली. या मुद्द्यावरून विरोध वाढत गेला आणि काही महिलांनी संबंधित ठिकाणी रस्त्यावर ठिय्या मांडला. त्यामुळे पथसंचलनाच्या मार्गाचा प्रश्न ऐरणीवर आला आणि परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
महिलांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरू केल्यानंतर परिस्थिती अधिक संवेदनशील बनली. दोन्ही गटांमधील तणाव वाढल्याच्या पार्श्वभूमीवर परिसरात तुरळक दगडफेक झाल्याची माहिती मिळत आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली. परिस्थिती आणखी चिघळू नये आणि जमावावर नियंत्रण मिळवता यावे, यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केल्याचे समजते. मात्र, दगडफेक नेमकी कोणी सुरू केली आणि त्यामागील कारण काय होते, याबाबत अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जळगाव जिल्हा पोलीस प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि विभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचा आढावा घेत परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले.



