जळगावातल्या शिवाजीनगर पुलाचे शेवटचे फुटेज ( व्हिडीओ )

जळगाव– तब्बल १०४ वर्षांच्या इतिहास असणारा शहरातला शिवाजीनगर रेल्वे पूल आता काळाच्या पडद्याआड जाणार आहे. तुटण्यापूर्वी याचे शेवटचे फुटेज खास जळगावकरांसाठी ! आता उरणार फक्त आठवणी !

शहरातील १०४ वर्षे जुना इंग्रजांच्या काळाचा साक्षीदार असलेला शिवाजी नगरचा पूल आज अखेर वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून येत्या काही तासांत तो जमीनदोस्त होणार आहे. इंग्रजांनी केलेल्या भक्कम दगडी बांधकामाचे अनेक नमुने आपल्या शहरातही अद्याप शाबूत आहेत. त्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी निवासस्थान, पोलीस अधीक्षक निवासस्थान फॉरेस्ट ऑफिसर निवासस्थान, जिल्हा न्यायालयाचा काही भाग, जिल्हा परिषदेची जुनी इमारत हे ते नमुने आहेत.

शहरातील शिवाजी नगरचा भाग ज्या पुलामुळे जोडला गेला तो पूल आता लवकरच नामशेष होणार असून त्याची जागा नवा पूल गेणार आहे. तोपर्यंत शिवाजीनगर वासियांना जुन्या पुलाच्या आठवणीत पर्यायी रस्त्याचा वापर करीत काही दिवस काढावे लागणार आहेत. जुन्या पुलाच्या आठवणींना उजाळा देण्याचा हा काळ असेल.

पुलावरील वाहतूक बंद होण्याचा एकूणच परिसरातील रहिवाशांच्या जीवनावर चांगलाच विपरीत परिणाम झाला आहे. नवा पूल हा अधिक भक्कम व बदलत्या काळाच्या गरजा विचारात घेऊन बनवलेला आधुनिक पूल असेल याची जरी या भागातील नागरिकांना जाणीव असली तरी आज जुना पूल नसण्याच्या वास्तवाचे चटके त्यांना सोसावेच लागणार आहेत. सुमारे पाच पिढ्यांचा साक्षीदार आणि सोबती असलेला हा पूल आता काळाच्या अटळ चक्रात नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. जुन्याने जावे आणि नव्याने त्याची जागा घ्यावी या सृष्टीच्या अलिखित नियमाचा हा भाग आहे. अर्थात शिवाजीनगरचा रेल्वे पूल हा आता फक्त आपल्या स्मरणातच राहणार असल्याचे कठोर वास्तव आपल्याला स्विकारावे लागणारच आहे. शिवाजीनगराच्या पुलावर हातोडा (खरं तर जेसीबीचे घाव !) पडण्याआधीचे शेवटचे फुटेज आम्ही आपल्याला सादर करत आहोत.

(सादरकर्ते- विवेक उपासनी; रिपोर्टर वासीम खान)

पहा – शिवाजीनगरच्या पुलाचा व्हिडीओ.

Add Comment

Protected Content