शासकीय महिला रूग्णालयातून साहित्य लांबविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तीनजण अटक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील मोहाडी रोडवरील शासकीय महिला रूग्णाालयाच्या बांधकामाच्या ठिकाणाहून १ लाख २७ हजार रुपये किमतीचे साहित्य चोरून नेणाऱ्या टोळीचा पर्दाफाश एमआयडीसी पोलिसांनी केला आहे. यात तांबापूर येथून ३ संशयित आरोपींना मुद्देमालासह अटक केली आहे.

या संदर्भात माहिती अशी की, जळगाव मोहाडीरोड वरील शासकीय महिला रुग्णालयाचे बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी बांधकामासाठी लागणारे साहित्य एका खोलीत ठेवण्यात आले होते. दरम्यान २ मार्च रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी बांधकामाच्या ठिकाणाहून असलेले खोलीचे कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करत १ लाख २७ हजार रुपये किमतीचे साहित्य चोरून नेले होते. याप्रकरणी ठेकेदार आयुष्य मणियार यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान सरकारी मालमत्तेची चोरी झालेली असल्या कारणामुळे या गुन्ह्याचा उघड करण्याच्या सूचना वरिष्ठांनी दिल्या होत्या. त्यानुसार गोपनीय माहितीनुसार एमआयडीसी पोलिसांनी संशयित आरोपी सदबीरसिंग बलवंतसिंग टाक वय-२१, गुरुजीतसिंग सुजानसिंग बावरी वय-२२, आणि तंजीम नसीम बेग मिर्झा वय-३६ तिघे रा. तांबापुरा, जळगाव यांना बुधवारी ६ मार्च रोजी रात्री ९ वाजता तांबापूर येथून अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीतील साहित्यांपैकी ९७ हजार रुपये किमतीचे साहित्य तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल आणि रिक्षा जप्त करण्यात आले आहे. यातील अटक केलेल्या तिनही संशयितांवर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, दीपक जगदाळे, सहायक फौजदार अतुल वंजारी, पोलीस हेडकॉन्स्टेबल रामकृष्ण पाटील, सचिन मुंडे, पोलीस नाईक, किशोर पाटील, सचिन पाटील, योगेश बारी, पोलीस कॉन्स्टेबल मुकेश पाटील, विशाल कोळी, राहुल रगडे, किरण पाटील, छगन तायडे, ललित नारखेडे आणि साईनाथ मुंडे यांनी केली आहे.

Protected Content