मालधक्क्यावर विजेचा धक्का लागल्याने मजुराचा मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । रेल्वे मालधक्क्यावर युरीयाचा रॅक रिकामा केल्यानंतर चप्पल बघण्यासाठी बोगीवर चढलेल्या संतोष रामू कुमार (वय-४५, रा. मूळ रा. हुसंगाबाद, मध्यप्रदेश, ह.मु. भारतनगर) यांचा शॉक लागून मृत्यू झाला. ही घटना सुरत रेल्वे गेटजवळील मालधक्क्यावर घडली. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मध्यप्रदेशातील हुसंगाबाद येथील रहिवासी संतोष रामू कुमार हे जळगाव शहरातील भारत नगरात खोली करुन वास्तव्यास हाते. सुरत रेल्वे गेटजवळील मालधक्क्यावर हमाली काम करुन आपल्या कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होते. दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास रेल्वे मालधक्क्यावर आलेला युरीया रॅक त्यांनी आपल्या इतर सहकाऱ्यांसोबत रिकामा केला. त्यानंतर त्यांची चप्पल मस्करी करण्यासाठी मालगाडीच्या बोगीवर फेकली असेल, म्हणून ते बघण्यासाठी संतोष कुमार हे बोगीवर चढले. मात्र त्याठिकाणाहून गेलेल्या विद्युत वाहिनीचा धक्का लागून ते बोगीवरुन खाली कोसळले. यावेळी विजेच्या धक्क्यामुळे गंभीर रित्या भाजल्या गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.

Protected Content