मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | टीव्ही विश्वातून एक वाईट बातमी येत आहे. टीव्ही अभिनेता विकास सेठीचे आज ८ सप्टेंबर रोजी निधन झाले आहे. विकासने वयाच्या ४८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’ या मालिकेने त्याला लोकप्रियता मिळवून दिली होती. या मालिकेनंतर त्याने कधीही मागे वळून पाहिले नाही. आता विकासच्या निधनाची बातमी ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे. विकासच्या अचानक जाण्याने चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
टेली चक्कर च्या रिपोर्टनुसार, विकास सेठीचा झोपेतच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. एकता कपूरच्या ‘क्यूंकि सास भी कभी बहू’ या मालिकेव्यतिरिक्त विकासने स्टार प्लसवरील ‘कसौटी जिंदगी की और कहीं तो होगा’ या मालिकांमध्ये काम केले होते. विकासच्या पश्चात आता पत्नी आणि जुळी मुले असा परिवार आहे. विकासच्या पत्नीचे नाव जान्हवी सेठी आहे. विकासच्या निधनाबाबत कुटुंबीयांकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
करण जोहरच्या ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटातही विकास सेठी दिसला होता. या चित्रपटात त्याने करीना कपूर खानचा मित्र रॉबीची भूमिका साकारली होती. याशिवाय विकास ‘दिवाना पन’मध्येही अभिनेता म्हणून दिसला होता. विकास 2019 मध्ये तेलुगू हिट चित्रपट स्मार्ट शंकरचा ही भाग होता. विकासच्या निधनाची बातमी ऐकून चाहत्यांना धक्का बसला आहे. अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे.