भावाची हत्या करणाऱ्याच्या भावाला मारून घेतला बदला; नांदेड शहर हादरलं

नांदेड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज  वृत्तसेवा  ।  एकीकडे देशभरात मोठ्या आनंदात दिवाळी साजरी केली जात असतांना, तिकडे नांदेड  शहर एका खुनाच्या घटनेने हादरले असल्याचे पाहायला मिळत आहे. भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आपल्या इतर साथीदारांच्या मदतीने एकाचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास एमजीएम महाविद्यालय परिसरातील विस्तारित नाथनगर येथे ही घटना घडली. भरत हरिसिंग पवार असे मयताचे नाव असून, विश्वास शिंदे असे आरोपीचे नाव आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी आरोपी विश्वास शिंदे याच्या भावाचा खून भरत पवार याच्या भावाने केला होता. त्यामुळे याचा राग विश्वासच्या मनात होता. तसेच, त्याने आपल्या भावाच्या खुनाचा बदला घेण्याचं ठरवलं. त्यानुसार, खुनाचा वचपा घेण्यासाठी विश्वास शिंदे सर्वत्र धूमधडाक्यात लक्ष्मीपूजन सुरू असताना भरत पवारच्या घराजवळ पोहचला. तसेच, भरत पवारला त्याच्या घराजवळ आपल्या अन्य दोन साथीदारासह घेरले. त्यानंतर खंजरने भरतवर वार करून त्याचा खून केला. त्यानंतर तिघेही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.

दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलिस अधीक्षक अबिनाशकुमार, उपविभागीय पोलिस अधिकारी सूरज गुरव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक जगदीश भंडरवार, विमानतळ पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विजय जाधव यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Protected Content