सोमय्या बसले अधिकार्‍याच्या खुर्चीवर ! : कारवाईची मागणी

मुंबई प्रतिनिधी | भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी नगरविकास मंत्रालयात अधिकार्‍यांच्या खुर्चीत बसून फाईलींची पाहणी केल्याने वाद निर्माण झाले असून त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी नगरविकास मंत्रालयात अधिकार्‍यांच्या खुर्चीवर बसून सरकारी फाईल तपासल्यावरून मोठा वाद निर्माण झालाय. कॉंग्रेस नेते सचिन सावंत यांनी यावर आक्षेप घेत सोमय्यांवर कारवाईची मागणी केली. यानंतर आता स्वतः किरीट सोमय्या यांनी देखील त्यांना प्रतिआव्हान दिले आहे.

किरीट सोमय्या म्हणाले, त्यांना नेमकी भीती कसली आहे, कोणत्या कोणत्या फाईल तपासल्या त्याची की वायकरची फाईल होती, की सरनाईकची फाईल होती की अशोक चव्हाण यांची फाईल होती याची भीती आहे? मला वाटतं भीती ती आहे. आम्हाला जगभरातून माहिती मिळते. वेगवेगळ्या स्तरावरून लोक माहिती देतात. घोटाळेबाजांची माहिती दिली जाते. यात उद्धव ठाकरेंपासून अशोक चव्हाण यांच्यापर्यंत समावेश असतो.

मी माहितीसाठी कुठेही जातो आणि यापुढेही जाणार आहे. मी माहिती गोळा करतो आणि घोटाळेबाजांना पाठवतो, असंही किरीट सोमय्या यांनी म्हटलं.

किरीट सोमय्या म्हणाले, आतापर्यंत ठाकरे सरकारने माझ्यावर अब्रनुकसानीच्या १३ खटले दाखल केलेत. माझ्यासह माझ्या कुटुंबाच्या चौकश्या लावल्या आहेत. आणखी एक चौकशी, होऊन जाऊ दे असे प्रति-आव्हान देखील त्यांनी दिले.

तर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करतांना नगरविकास खात्याने हे तपासून पहावं. फाईल त्या विभागाच्या ताब्यात असतात. जो या सरकारचा घटक किंवा संविधानिक पद नाही अशी कोणी व्यक्ती फाईल उघडून पाहू शकतं असं मला वाटत नाही अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

Protected Content