किनगावात किराणा दुकान फोडले; अडीच लाखांचा सामान लंपास

kingaon news

यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील किनगाव येथील एका किराणा दुकानात अज्ञात चोरट्यांनी दुकान फोडुन अडीच लाख रूपयांचा सामान चोरून नेल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. चोरीच्या घटनेमुळे व्यापारी वर्गात भीती व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील किनगाव या गावातील मुख्य चौकातील ग्रामपंचायतच्या संकुलनात असलेली अजय निळकंठ पाटील यांचे अजय किराणा होलसेल स्टोअर्समध्ये काल मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर तोडुन 2 लाख 50 हजार रुपयांचे सिगारेट व आदी वस्तु चोरून नेल्याची घटना घडली. किनगाव गावातील मुख्य चौकात घडलेल्या या धाडसी चोरीच्या घटनेमुळे गावातील व परिसरातील व्यापारी आणि ग्रामस्थामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

श्वान पथक घटनास्थळी दाखल
चोरीच्या घटनेची माहीती मिळताच यावलचे पोलीस निरिक्षक रविकांत सोनवणे यांनी तात्काळ श्वान पथकासह घटनास्थळी भेट दिली. यावेळी श्वानपथकाने गावातील मुख्य चौकापासून ते जामा मश्जिदकडुन कुरेशी वाडया, सोनार गल्लीपासुन पुनश्च मुख्य चौक ते बसस्थानकापर्यंतचा मार्ग दाखविला असुन पो.नि.रविकांत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि जितेंद्र खैरनार, पोलीस कर्मचारी सुनिल तायडे, संजय देवरे आदींनी चोरीचा पंचनामा केला. गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

गेल्या तीन दिवसातील तिसरी घटना
दरम्यान काल रात्री यावल तालुक्यातील बामणोद येथील शशीकांत कोल्हे यांच्या घरातुन देखील अज्ञात चोरट्यांनी सुमारे 4 लाख रुपये चोरून नेल्याची घटना घडली असुन या संदर्भात फैजपुर पोलीसात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावल तालुक्यातील अद्रावल येथील शेतकरी विजय बाविस्कर यांच्या मोटरसायकलच्या डीक्कीतुन भरदिवसा दोन चोरट्यांनी एक लाख रुपये चोरून पसार झाल्याची घटना घडली आहे, मागील दोन दिवसात एक लाख रुपयांच्यावर चोरीची ही तिसरी घटना आहे.

Protected Content