वर्षातील पहिल्या अंगारकीला लाकडी श्रीगणेशाच्या समोर भाविक नतमस्तक!

खामगाव-अमोल सराफ | खामगावकरांचे आराध्य दैवत असलेल्या मानाच्या लाकडी गणपतीचे दर्शन घेण्यासाठी आज वर्षातील पहिल्या अंगारकी चतुर्थीला भाविकांची मोठी गर्दी उसळली.

खामगावकरांचे आराध्यदैवत असलेला मानाचा लाकडी गणपती हा पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. अंदाजे १५० वर्षापूर्वी व्यवसायानिमित्त खामगावात स्थायिक झालेल्या दक्षिणेकडील अय्या (आचारी) लोकांनी येथील सराफा परिसरातील अय्याची कोठी भागात या लाकडी गणपती मंदिराची स्थापना केली आहे. संपूर्ण लाकडाने बनविलेली सहा फूट उंचीची मूर्ती येथे आहे. ही सुंदर गणेशमूर्ती भाविकांच्या खास आकर्षणाचे केंद्र आहे. प्रारंभी लाकडी गणपतीचे साधे मंदिर होते. १९९७ साली सध्याच्या व्यवस्थापक मंडळाने या मंदिराचा जीर्णोद्धार करून नवीन मंदिराची उभारणी केली आहे. खामगावातील गणेशोत्सव विसर्जनाचे मिरवणुकीत मानाच्या लाकडी गणपतीला विशेष महत्त्व असते. मानाचा गणपती निघाल्याशिवाय शहरातील विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होत नाही अशी येथील परंपरा आहे. लाकडी गणपती विसर्जन मिरवणुकीत भाग घेत असला तरी या मूर्तीचे विसर्जन होत नाही तर केवळ मूर्ती हलवून विसर्जन केले जाते व मिरवणुकीनंतर मूर्ती पुन्हा मंदिरात ठेवली जाते.

गणेशोत्सवाच्या दहा दिवस तसेच दर महिन्याच्या संकष्ट चतुर्थीला भाविकांची लाकडी गणपती मंदिरात मोठी गर्दी होते. भाविक सत्यनारायणाची पूजा घालून देवाला साकडे घालतात. पुणे, मुंबईपासून भाविक लाकडी गणपतीच्या दर्शनाला येतात. खामगावकरांचे आराध्यदैवत असल्याने लाकडी गणपतीशी भाविकांच्या धार्मिक भावना जुळलेल्या आहेत. त्यामुळे सदर गणपती विसर्जन मिरवणुकीचे दिवशी दुपारी दोन वाजेपर्यंत आपल्या मंदिरात शांततेत पोहोचला पाहिजे याकरिता संस्थानचे उपाध्यक्ष अँड. व्ही. वाय. देशमुख, व्यवस्थापक अग्रवाल, सचिव शेखर पुरोहित, सदस्य दिनेश अग्रवाल, कैलास अग्रवाल व त्यांचे सहकारी तसेच पोलीस प्रशासन झटत असते. विसर्जनाकरिता सदर गणपती सकाळी ९ वाजता फरशीवर आणण्याचा संस्थानचा प्रयत्न असतो. याची सर्व जबाबदारी संस्थानचे उपाध्यक्ष अँड. व्ही. वाय. देशमुख यांनी स्वीकारली आहे.

दरम्यान, आज वर्षातील पहिली अंगारकी चतुर्थी असल्याने भल्या पहाटेपासूनच भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्याचे दिसून आले. तर भाविकांच्या सुविधेसाठी संस्थेने विशेष व्यवस्था केली होती.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content

%d bloggers like this: