मुक्ताईनगरात ‘खडसे पॉवर’ ! : १२ ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादीचा झेंडा

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | काही दिवसांपुर्वीच दुध संघातील पराभवामुळे एकनाथ खडसे अडचणीत आले असले मानले जात असतांना आज ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत तालुक्यात राष्ट्रवादीला चांगले यश मिळाल्याचे दिसून आले.

आज मुक्ताईनगर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल लागले. यात राष्ट्रवादी कॉंग्रेसला घवघवीत यश लाभल्याचे अधोरेखीत झाले. यात कुर्‍हा-काकोडा येथे अतिशय चुरशीची लढत होती. एक तर ही ग्रामपंचायत मोठी असून येथे भाजप-शिंदे सेनेच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आमदार मंगेश चव्हाण आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी जोरदार प्रचार केला होता. या प्रतिष्ठेच्या लढाईत एकनाथराव खडसे यांच्या सहकार्‍यांनी बाजी मारली आहे.

मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्‍हा ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस ने भाजप आणि शिंदे गटाचा धुव्वा उडविला. येथेराष्ट्रवादी डॉ. बी सी महाजन यांनी भाजपचे भागवत दगडू राठोड यांचा १हजार १७९ मतांनी पराभव केला. हा परिसर आधी भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला मानला जात होता. यंदा मात्र येथून राष्ट्रवादीने बाजी मारली आहे. याचा मोठा धक्का आमदार चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. अशोक फडके आणि अशोक कांडेलकर यांना बसल्याची बाब उघड आहे.

कुर्‍हा-काकोडा येथे प्रचारात दोन्ही बाजूंनी एकमेकांवर जोरदार टिकास्त्र सोडले. यात राष्ट्रवादी कॉंग्रेसपक्षा कडून आ.एकनाथ खडसे व आ.अमोल मिटकरी यांच्या सभांना चांगला प्रतिसाद लाभला. तर डॉ. बी. सी. महाजन यांची देखील येथे चांगली पकड असल्याचा लाभ त्यांना मिळाला. यामुळे भाजपकडून ही ग्रामपंचायत राष्ट्रवादीकडे आली आहे.

लक्षणीय बाब अशी की, मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात १३ पैकी १२ ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस चा झेंडा फडकला आहे. मतदारांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस व नाथाभाऊ वर विश्वास दाखविलेला आहे. यामुळे एकनाथराव खडसे यांचे मतदारसंघावरील वर्चस्व कायम असल्याचेही यातून अधोरेखीत झाले आहे.

Protected Content