जामनेर तालुक्यातील दोन मातब्बर विरोधी नेते भाजपच्या वाटेवर !

पहूर, ता.जामनेर- रविंद्र लाठे | जामनेर तालुक्यातील ना. गिरीश महाजन यांचे अजून दोन मातब्बर विरोधक अर्थात पहूर येथील माजी जि.प. सभापती प्रदीप लोढा आणि पाळधी येथील माजी जि.प. सदस्य कैलास एकनाथ पाटील हे आपापल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश करण्यावर शिक्कामोर्तब झाले असून ते लवकरच भव्य कार्यक्रमात जय श्रीराम म्हणणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

अलीकडच्या काळात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे मातब्बर नेते संजयदादा गरूड यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतल्याने तालुक्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. यानंतर आता पुन्हा दोन मातब्बर नेते भाजपच्या वाटेवर असल्याचे संकेत मिळाले आहेत. यात माजी जि.प कृषी सभापती, माजी सरपंच पहूर पेठ, माजी संजय गांधी निराधार समिती तालुकाध्यक्ष, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती जामनेर, माजी संचालक राहुरी कृषी विद्यापीठ, माजी संचालक जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँक जळगाव, अध्यक्ष महावीर पब्लिक स्कूल, अध्यक्ष महावीर गोशाळा पहूर, माजी चेअरमन कृषी पंडित मोहनलाल लोढा पतसंस्था तसेच तब्बल २५ वर्षे पहुर पेठ गावाची सरपंच म्हणून धुरा सांभाळणारे प्रदीप लोढा यांचा समावेश आहे. त्यांच्या सोबतीला पाळधी ता.जामनेर गावाचे माजी जि. प. सदस्य, तब्बल पंधरा वर्षे पाळधी गावाचे सरपंच पद, विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन, दूध उत्पादक संस्था सोसायटी, कैलास एकनाथ पाटील हे देखील भाजपमध्ये दाखल होणार आहेत.

दरम्यान, प्रदीप लोढा यांनी पहूर पेठ ग्रामपंचायत च्या माध्यमातून तब्बल पंचवीस वर्षे सरपंच राहून गावाचा सर्वांगीण विकास हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून गावात कायमस्वरूपी पाण्याचा प्रश्न सोडविला आहे. तसेच फुले शाहू आंबेडकर दलित वस्ती सुधार योजनेत सतत पाच वर्षे जिल्ह्यातून प्रथम क्रमांक व २०११ १२ मध्ये याच योजनेत विभागीय पातळीवर प्रथम क्रमांक मिळवून गावाचा नावलौकिक वाढविला आहे.

१९९५ साली गिरीश महाजन सरपंच असताना प्रथम आमदार होण्याकरिता स्वर्गवासी कृषी पंडित मोहनलाल लोढा व स्वर्गवासी जि. प. सदस्य एकनाथ रामचंद्र पाटील यांच्या ग्रुप स्वर्गवासी मनोहर शेठ धारिवाल, स्वर्गवासी नारायण सोनजी पाटील, जगन दादा लोखंडे, पारस ललवाणी या सर्व मान्यवरांनी ईश्वर बाबूजी जैन यांच्या विरोधात गिरीश महाजन यांना मदत करून प्रथम आमदार बनवण्यासाठी मोलाचे सहकार्य केले होते. नंतर साधारणतः २००० पासून ते आतापर्यंत प्रदीप लोढा, कैलास पाटील यांनी गिरीश भाऊंच्या विरोधात राहून सुरेशदादा जैन व संजय दादा यांच्या सहकार्याने पंचवीस वर्षे पहूर पेठसह परिसरात वाटचाल केली. यात पहूरचे सरपंचपद, जि. प.कृषी सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती जामनेर, संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष, राहुरी कृषी विद्यापीठावर संचालक अशा विविध पदांवरून त्यांनी जनसेवा केली. तसेच माजी जि.प कृषी सभापती प्रदीप लोढा यांचे सहकारी मित्र व गेल्या पन्नास वर्षांपासून राजकारणात खांद्याला खांदा लावून काम करणारे कैलास पाटील यांनी जि. प. सदस्य, पंधरा वर्षे सरपंच पद, चेअरमन विविध कार्यकारी सोसायटी, चेअरमन दूध उत्पादक सोसायटी आदींवर आपल्या कामाची मोहर उमटवली. त्यांच्या वहिनी सुद्धा जि. प. सदस्य पदावर कार्यरत होत्या.

पहूर येथील माजी जि प कृषी सभापती प्रदीप लोढा, कैलास पाटील यांच्यासह जामनेर तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत लवकरच जळगावला पार पडणार आहे. त्यांच्या भारतीय जनता पार्टीत येण्याच्या निर्णयाने पहूर व पाळधी गटात भारतीय जनता पार्टीला येणार्‍या निवडणुकांमध्ये निश्चितच फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे.

Protected Content