फडणवीस सरकारच्या बहुमतासाठी काही अधिकारी झटत होते- शिवसेना

मुंबई । गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या आरोपांना पुष्टी देत, ”फडणवीस सरकारच्या बहुमतासाठी राज्यातील काही अधिकारी झटत होते” असा आरोप आज शिवसेनेने केला आहे. यात गुप्तचर खात्याचाही समावेश असल्याचा धक्कादायक आरोप देखील करण्यात आला आहे.

राज्यातील काही अधिकारी हे महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा धक्कादायक आरोप गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. यानंतर त्यांनी आपण असे बोललोच नसल्याचे सांगत यावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. यानंतर आता शिवसेनेने या दाव्याला समर्थन दिले आहे. पक्षाचे मुखपत्र असणार्‍या दैनिक सामनामध्ये आजच्या अग्रलेखातून याबाबत भाष्य करण्यात आले आहे.

या अग्रलेखात म्हटले आहे की, प्रशासन हे निवडून येणार्‍या लोकनियुक्त सरकारचे असते. एखाद्या राजकीय पक्षाचे नसते. सरकार बदलताच भलेभले अधिकारी टोप्या फिरवतात. उगवत्या सरकारला त्यांना नमस्कार करावाच लागतो. हे फक्त महाराष्ट्रातच नाही, तर देशभरात सर्व स्तरांवर सुरू असते. मुळात फडणवीस यांचे सरकार जाणार नाही या भ्रमात येथील प्रशासन निवडणुकीआधी आणि नंतर काही काळ होते. ते त्याच भ्रमात तरंगत होते. त्यामुळे पोलीस असतील किंवा मंत्रालय, महसूल खाते एकजात सर्व अधिकारी वर्ग त्याच संघ धुंदीत गुंग झाला होता. अनेक महत्त्वाच्या नेमणुका संघ परिवाराच्या शिफारशीने किंवा हस्तक्षेपाने होत असत. पोलीस अधिकारी, आयुक्त, सरकारी वकिलांच्या नेमणुकांत हे सर्रास घडत होते. ही व्यवस्था यापुढे अशीच निरंकुश सुरू राहणार असेच वातावरण असल्याने पोलीस, नागरी सेवेतले अधिकारी त्याच व्यवस्थेच्या पांगुळगाड्यावर बसून प्रवास करीत होते, पण १०५ आमदारांची ताकद असूनही भाजप सरकार बनवू शकला नाही हे सत्य स्वीकारायला त्यांना वेळ लागला.

यात पुढे म्हटले आहे की, राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रात लादण्याआधी जो पहाटे पहाटे सरकार स्थापनेचा सोहळा पार पाडला त्या गुप्त कटात काही अधिकारी सामील असायलाच हवेत व हे सर्व नाटय वरिष्ठ प्रशासकीय पातळीवर झाले. मुख्यमंत्र्यांच्या मर्जीत राहता यावे म्हणून काही पोलीस अधिकारी लहान पक्षांच्या आमदारांना व अपक्षांना वेगवेगळया पद्धतीने जाळयात ओढत होते. आमदारांचे कच्चे दुवे शोधून पहाटेच्या मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करीत होते. गुप्तचर खात्यानेही याकामी विशेष कामगिरी बजावली हे सत्यच आहे. फडणवीसांचे सरकार कोसळले व महाविकास आघाडीचे सरकार यायचे ते आलेच. त्यामुळे या मंडळींचे मन खट्टू झाले. सरकार पाडणे म्हणजे काय असते? सरकारसंदर्भातले काही विषय गुप्तपणे विरोधकांकडे पोहोचवणे व सरकारच्या विरोधात प्रशासकीय यंत्रणेत अविश्‍वासाचे वातावरण निर्माण करणे. अशा प्रवृत्तींवर निगराणी ठेवणे हे गृहखात्याचे काम आहे. ते त्यांनी चोख पार पाडले तर सरकारचे भवितव्य उत्तम आहे. सरकार पाडण्याचा वगैरे प्रयत्न कोणताही अधिकारी करीत नाही. ते फक्त मनसुबेच ठरतात, पण अस्तनीत निखारे हे असतातच. सावधगिरी बाळगावीच लागेल! असे या अग्रलेखात म्हटले आहे.

Protected Content