जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला नॅक पुनर्मूल्यांकनाच्या चौथ्या साखळीत ‘अ’ श्रेणी कायम राखली असून ३.०९ अशी एकत्रित गुणांची सरासरी (सीजीपीए) प्राप्त झाली आहे.
कुलगुरु प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठ नॅक पुनर्मूल्यांकनाला सामोरे गेले. २३ ते २५ ऑगस्ट या कालावधीत नॅक पिअर टीमने विद्यापीठाला प्रत्यक्ष भेट दिली होती. आसाम विद्यापीठाचे माजी कुलगुरु प्रा.दिलीप चंद्रा नाथ यांच्या अध्यक्षतेखालील समितीत इतर तीन सदस्यांचा समावेश होता. विद्यापीठाने जानेवारीत राष्ट्रीय मूल्यांकन व प्रमाण परिषदेकडे (नॅक) स्वयं मूल्यांकन अहवाल सादर केल्या नंतर जून २०२२ मध्ये तो नॅकव्दारे मान्य करण्यात आला. या अहवालाच्या आधारे विद्यापीठाचे ७० टक्के मूल्यमापन यापूर्वीच झाले होते तर गुणवत्ता आधारित ३० टक्के मूल्यमापनासाठी नॅक पिअर टीम प्रत्यक्ष विद्यापीठात आली होती. या पिअर टीमने शैक्षणिक प्रशाळा, प्रशासकीय विभाग, विद्यार्थी वसतिगृह आदींना भेटी दिल्या. तसेच आजी व माजी विद्यार्थी, पालक, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांशी संवाद साधला होता. आणि या भेटी नंतर नॅककडे आपला अहवाल सादर केला होता.
बंगळुरु येथे नॅकच्या स्थायी समितीची बैठक दिनांक ३० ऑगस्ट रोजी झाली. या बैठकीत मूल्यमापनाच्या आधारे आलेल्या मानांकनावर शिक्कामोर्तब करुन नॅकच्या संकेतस्थळावर हे मानांकन जाहीर करण्यात आले आहे.
विद्यापीठाला ३.०९ सीजीपीए सह ‘अ’ श्रेणी प्राप्त झाली असून यापूर्वीची ‘अ’ श्रेणी कायम राखली आहे. २०१५ मध्ये नॅकच्या तिसऱ्या साखळीत विद्यापीठाला ३.११ सीजीपीए सह “अ” श्रेणी प्राप्त झाली होती. तर त्या पूर्वी २००९ मध्ये २.८८ सीजीपीए सह “ब” श्रेणी प्राप्त झाली होती. तर २००१ मध्ये पहिल्या नॅकला सामोरे जातांना चार स्टार प्राप्त झाले होते.
नॅकव्दारे पुनर्मूल्यांकनात अभ्यासक्रम, अध्यापन-शिक्षण-मूल्यमापन, संशोधन-नवकल्पना आणि विस्तार, पायाभूत सुविधा आणि शिक्षण संसाधने, विद्यार्थ्यांची प्रगती, प्रशासन-नेतृत्व आणि व्यवस्थापन, संस्थात्मक मूल्य आणि सर्वोत्तम पध्दती अशी सात निकषे प्रामुख्याने तपासली जातात. अंतिम ७० टक्के मूल्यमापनात गुणात्मक निर्देशक परिणामकारकता पाहिली जाते. तर पिअर टीमव्दारे ३० टक्कयांसाठी होणाऱ्या मूल्यमापनात गुणवत्ता निेर्देशकाचे समग्र विश्लेषण असते. त्यात विद्यापीठाचे सामर्थ्य, कमतरता आणि आव्हाने यांचा समावेश असतो.
नॅक पिअर टीमने विद्यापीठाच्या प्रत्यक्ष भेटीत जी निरीक्षणे नोंदविली आहेत. त्यामध्ये विद्यापीठाच्या दूरदर्शी आणि गतिमान नेतृत्वाचे कौतुक केले आहे. नाविन्यपूर्ण आणि गरजेवर आधारित अभ्यासक्रम, आनंददायी वातावरणासह प्रदुषणमुक्त विद्यापीठ परिसर, परिक्षेत्रातील ग्रामीण व आदिवासी विद्यार्थ्यांची शैक्षणिक भूक भागविण्याचे सामर्थ्य, अत्याधुनिक प्रयोगशाळा आणि संगणकीय सुविधा उपलब्ध, उत्तम भौतिक सुविधा आणि माहिती व तंत्रज्ञानाचा वापर, गुणवत्तापूर्ण व निष्ठावान शिक्षक, अध्ययन, अध्यापन, परिक्षा आणि प्रशासनात संगणकाचा उत्तम वापर, लवचिक आणि सर्वांचा सहभाग यामुळे संस्थेबद्दल लोकांमध्ये आपुलकीची भावना, पुरेशा क्रीडा सुविधा अशा १० मुद्यांचा ठळकपणे उल्लेख पिअर टीमने आपल्या निरीक्षण अहवालात केला आहे.
याशिवाय विद्यापीठाला शैक्षणिक विकासासाठी काही सूचना केल्या आहेत. त्यामध्ये रिक्त शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या जागा त्वरीत भरण्यात याव्यात, कॅम्पस मध्ये विद्यार्थ्यांना अंतर्गत वाहतूकीसाठी पुरेशा सुविधा वाढवाव्यात, परराज्य व इतर देशातील विद्यार्थ्यांना विद्यापीठात प्रवेश घेण्यास आकर्षित करण्यासाठी प्रत्येक विद्याशाखेत प्रवेश परीक्षा असाव्यात. विद्यापीठ कॅम्पस मध्ये पदवीस्तरावरील अभ्यासक्रम वाढवावेत, आंतर विद्याशाखीय रोजगाराभिमुख अभ्यासक्रम अधिक सुरु व्हावेत ज्यामुळे उद्योजकीय कौशल्य वाढीला लागेल, देशांतर्गत व देशाबाहेर शिक्षक आदान-प्रदान व्हावेत, विद्यापीठात स्पर्धा परीक्षांसाठी असलेले डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा अधिक विस्तार व्हावा, उच्च पदावर असलेल्या माजी विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवावा, केंद्रीय प्रशिक्षण व नियुक्ती कक्ष अधिक मजबूत करण्यात यावा, बिगर शासकीय संस्था आणि दानशूर व्यक्तींकडून विद्यापीठाने निधी गोळा करण्याासाठी प्रयत्न करावेत. अशा सूचना या अहवालात करण्यात आल्या आहेत.