यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा तालुक्यातील देवझीरी आणि कर्जाणे येथील आदीवासी आश्रम शाळांना आदिवासी प्रकल्प समितीचे अध्यक्ष डॉ. चंद्रकांत बारेला यांनी शनिवारी २६ फेब्रुवारी भेट देवून कामांचा आढावा घेतला.
या पाहणी दौऱ्यात कर्जाणे येथील अनुदानीत आश्रमशाळेची व्यवस्था उत्तम तर देवझीरी येथील शासकीय आश्रमशाळेची अवस्था अत्यंत दयनीय असल्याचे निदर्शनास आले असून देवझीरी आश्रमशाळेचा अहवाल आपण लवकरच आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी यांना पाठवणार असल्याचे डॉ.चंद्रकांत बारेला यांनी सांगितले.
कर्जाणे येथील आश्रमशाळेत विद्यार्थी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांची संख्या समाधान कारक होती. देवझीरी शासकीय आश्रमशाळेला भेट दिली असता तिथं शिक्षणाचा खेळ – खंडोबा झालेला बघायला मिळाला. शिक्षक,विद्यार्थी अधिक्षिका कुणीही ठिकाणावर नव्हते. शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी, स्वयंपाकी, विना परवानगी सुट्टी टाकून दांड्या मारत असतात, कधीतरी एकत्र येऊन मस्टरवर सह्या करतात मुलींचे मुलांचे वसतीगृह बंद असून भोजन व्यवस्था शासकीय नियमा नुसार नाही,शिक्षण साहीत्य,पुस्तके कपाटात धूळ खात पडलेले असून ते मुलांना वाटप केले गेले नाही. यावल प्रकल्प कार्यालयाकडून शाळेसाठी संगणक देण्यात आले आहे, मात्र शाळेत संगणक नाही, मग गेले कुठे ? असा संतप्त सवाल डॉ.बारेला यांनी यावेळी विचारला. प्रयोग शाळा नाही, ठेका पद्धतीने दिला जाणारा किराणा सामान नाही, भाजीपाला, केळी, अंडी, वेळेवर पोचत नाही. असा आरोप विद्यार्थ्यांसह पालकांकडून केला जात आहे. मुख्याध्यापक सुनील चौधरी यांनी शाळेत कहर माजवला असल्याचे यावेळी लक्षात आले. त्यांची योग्य त्या ठिकाणी तक्रार करण्यात येऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी आपण करणार असल्याचे डॉ.बारेला यांनी सांगितले.