अतिक्रमण हटाव पथकाला धक्काबुक्की : आशिक तेलीस अटक

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील अतिक्रमण काढणार्‍या पथकाला अटकाव करत पोलीसांना धक्काबुक्की केल्या प्रकरणी भाजपचे माजी गटनेते मुन्ना तेली यांचे चिरंजीव आशीक तेली यांना पोलिसांनी अटक केली आहे.

भुसावळ पालिकेच्या माध्यमातून शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबवणे सुरू आहे. यात शनिवारी खडका रोड भागातील एम.आय.तेली बिल्डर कार्यालया समोरील गटारी वरील ढाप्याचे अतिक्रमण काढणे सुरू होते. यावेळी पालिकेचे माजी गटनेते मुन्ना तेली यांचे चिरंजीव आशिक तेली यांनी पथकाला अटकाव केला. हा वाद सोडवण्यासाठी आलेले पोलिस अधिकारी, कर्मचार्‍यांना शिविगाळ, धक्काबुकी केली. त्यामुळे पोलिसांनी आशिकला अटक करुन शासकीय कामात अडथळा, लोकसेवकास मारहाण, धक्काबुकी, शिविगाळ केल्याचा गुन्हा दाखल केला.

दरम्यान, शुक्रवारी दिवसभरात पालिकेने शहर पोलिस ठाणे हद्दीत १४, तर बाजारपेठ च्या हद्दीत ५४ अशी ६८ अतिक्रमणे नष्ट केली. पालिकेने गुरुवारपासून जळगाव रोड, हंबर्डीकर चौक, जामनेर रोडवरील अतिक्रमण काढले. दरम्यान, आशिक तेली यांनी नगरपालिकेच्या पथकातील स्थापत्य अभियंता विजय तोष्णीवाल, वसंत राठोड, आरेखक महेश चौधरी यांच्याशी हुज्जत घालून अतिक्रमण काढण्यास विरोध दर्शवला. यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक हरीष भोये हे समजावण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, आशिकने भोये यांची कॉलर पकडल्याने वाद झाला. कॉलर पकडून धमकावले. यासोबत त्याने आरसीपी क्रमांक २ मधील कर्मचारी एस.एस.तडवी यांनाही धक्काबुक्की झाली. या वादात सहायक निरीक्षक भोये यांच्या मानेजवळ, कर्मचारी राहुल वानखेडे यांच्या उजव्या हाताला जखम झाली. यानंतर पोलिसांनी आशिकला तत्काळ अटक केली. पोलिस कर्मचारी सुनील तडवी यांच्या फिर्यादीवरून आशिक विरूद्ध शासकीय कामात अडथळा , पोलिस अधिकार्‍यांना शिवीगाळ, इच्छा पूर्वक दुखापत व धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

तर, दुसरीकड अतिक्रमण हटाव मोहिमेचे वार्तांकन करण्यासाठी गेलेले पत्रकार ज्ञानेश्वर आमले हे आशिक तेली यांना मारहाण होत असल्याचे छायाचित्र व व्हीडिओचित्रण करत होते. याचा राग आल्याने बाजारपेठेचे पोलिस निरीक्षक राहूल गायकवाड यांनी आपल्याला मारहाण केली, अशी तक्रार आमले यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे केली. गायकवाड यांनी मोबाइल हिसकावून कानशिलात लगावली. तोंडावर मारहाण करत खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. त्यांच्यावर कारवाई करावी, अन्यथा सोमवारपासून (दि.२८) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसू असा इशारा दिला. पत्रकारांनी या प्रकाराचा निषेध केला आहे.

Protected Content