Home Cities जळगाव धरणगाव तालुक्यातील सिंचन प्रकल्पांची करिश्मा नायर यांच्याकडून पाहणी 

धरणगाव तालुक्यातील सिंचन प्रकल्पांची करिश्मा नायर यांच्याकडून पाहणी 


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जिल्ह्यातील जलसंधारण आणि सूक्ष्म सिंचन प्रकल्पांच्या कामांना गती देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर  यांनी धरणगाव तालुक्यातील विविध सिंचन प्रकल्प आणि बंधाऱ्यांची पाहणी केली. आगामी पावसाळा आणि सध्याची पाणीटंचाई लक्षात घेता सुरू असलेल्या कामांचा दर्जा उच्च प्रतीचा राखण्यात यावा आणि कोणत्याही परिस्थितीत गुणवत्तेशी तडजोड होऊ नये, अशा स्पष्ट सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागामार्फत जिल्हाभरात मोठ्या प्रमाणावर सिंचन आणि जलसंधारणाची कामे सुरू आहेत. सध्या जिल्ह्यात एकूण ३४५ सिंचन प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली असून त्यापैकी २८९ कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. आतापर्यंत १०५ कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामे १५ जूनपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. या प्रकल्पांमुळे सुमारे ३६०० हेक्टर क्षेत्र प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या सिंचनाखाली येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

ग्रामीण भागातील नाले, ओढे आणि जलस्रोतांवर बंधारे बांधून पाणी अडविणे आणि जमिनीत जिरविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. धरणगाव तालुक्यातील झुरखेडे, शेरी, बांभोरी, सोनवद, पाळधी, जांभोर आणि पिंप्री खु. येथे सुरू असलेल्या सिंचन प्रकल्पांना भेट देत करिश्मा नायर यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी कामांचा वेग, बांधकामाची गुणवत्ता आणि तांत्रिक बाबींचा आढावा घेण्यात आला.

पाहणीदरम्यान त्यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सांगितले की, जलसंधारणाची कामे ही भविष्यातील पाणी उपलब्धतेसाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. त्यामुळे निधीचा योग्य वापर करत वेळेत आणि गुणवत्तापूर्ण काम पूर्ण करण्यावर भर द्यावा. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना याचा मोठा लाभ होणार असून पाण्याची उपलब्धता वाढविण्यासाठी ही कामे निर्णायक ठरणार आहेत.

या दौऱ्यादरम्यान करिश्मा नायर यांनी झुरखेडे येथील आरोग्य उपकेंद्र आणि अंगणवाडी केंद्रालाही भेट दिली. तेथील सुविधांची पाहणी करून आवश्यक सूचना देण्यात आल्या. तसेच सोनवद येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देत आरोग्य सेवा आणि उपलब्ध सुविधांचा आढावा घेतला.


Protected Content

Play sound