Home Cities जळगाव जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढविण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज-  रोहन घुगे  

जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वाढविण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज-  रोहन घुगे  


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचविण्यात जिल्हा परिषद शाळांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून या शाळांची गुणवत्ता आणि पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षकांनी विशेष प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले. निपुण भारत अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या शाहू महाराज सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीला शिक्षण विभागातील अधिकारी, केंद्रप्रमुख आणि मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या बैठकीत जिल्ह्यात निपुण भारत अभियानाची अंमलबजावणी, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता आणि जिल्हा परिषद शाळांची वाढती स्पर्धा याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची पहिली पायरी जिल्हा परिषद शाळांपासून सुरू होते. त्यामुळे या शाळा म्हणजे समाजातील नवीन पिढी घडविणारी खरी मंदिरे आहेत. येणाऱ्या काळात जिल्हा परिषद शाळांमध्ये अधिकाधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा यासाठी शिक्षकांनी गावपातळीवर जनजागृती आणि गुणवत्ता वाढीवर भर देणे आवश्यक आहे.

ते पुढे म्हणाले की, ज्या शाळा पटसंख्या वाढविण्यात यशस्वी ठरतील त्यांना जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून विशेष निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. तसेच अशा शाळांचा जिल्हास्तरावर गौरव करण्यात येणार असून शिक्षकांच्या कार्याची दखलही घेतली जाईल. विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक गुणवत्तेसोबतच शिस्त, आत्मविश्वास आणि कौशल्य विकास घडवून आणण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

या बैठकीत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी Karishma Nair यांनीही मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, जिल्ह्यातील एकही शाळा निपुण होण्यापासून वंचित राहता कामा नये. विद्यार्थ्यांची निपुण क्षमता वाढविण्यासाठी शिक्षकांनी अधिक सक्रियपणे काम करण्याची गरज आहे. फक्त पुस्तकी ज्ञान न देता विद्यार्थ्यांचे अवांतर ज्ञान, बौद्धिक विकास आणि सर्जनशीलता वाढविणाऱ्या शिक्षणपद्धतीचा अवलंब करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

यावेळी शिक्षण विभागासाठी स्वतंत्र धोरण आणि कृती आराखडा तयार करण्यावर भर देण्यात आला. प्रत्येक महिन्याला जिल्हास्तर आणि तालुकास्तरावर निपुण भारत अभियानाचा आढावा घेण्यात यावा तसेच शिक्षक आणि मुख्याध्यापकांच्या नियमित बैठका आयोजित करून प्रगतीचा आढावा घ्यावा, अशा सूचनाही बैठकीत देण्यात आल्या.

या बैठकीला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज चौधर, शिक्षणाधिकारी निलेश पाटील, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. अनिल झोपे, माध्यमिक शिक्षण अधिकारी कल्पना चव्हाण यांच्यासह जिल्ह्यातील गटशिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख आणि मुख्याध्यापक उपस्थित होते.


Protected Content

Play sound