Home Cities जळगाव ‘लाडकी बहीण’ योजना: शासनाकडून केवायसी करण्याचा कोणताही आदेश नाही !

‘लाडकी बहीण’ योजना: शासनाकडून केवायसी करण्याचा कोणताही आदेश नाही !


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  लाडकी बहीण योजनेच्या केवायसी प्रक्रियेबाबत सोशल मीडियावर आणि विविध माध्यमांतून पसरलेल्या चर्चांमुळे जळगाव जिल्हा महिला व बालविकास कार्यालयात महिलांची मोठी गर्दी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र शासनाकडून अद्याप कोणतेही अधिकृत निर्देश प्राप्त झाले नसून, कार्यालयात कोणतेही केवायसी फॉर्म भरून घेतले जात नसल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी ऋषिकेश काळे यांनी दिली आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अनावश्यक गर्दी टाळावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दोन ते तीन दिवसांपूर्वी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनी जिल्हा महिला व बालविकास कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. केवायसी प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती मिळाल्यानंतर अनेक महिला कार्यालयात दाखल झाल्या. यामुळे कार्यालय परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, संबंधित विभागाकडून अशा कोणत्याही प्रक्रियेस सुरुवात झालेली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

जिल्हा महिला व बालविकास अधिकारी ऋषिकेश काळे यांनी ‘लाईव्ह ट्रेंड्स’शी बोलताना सांगितले की, “शासनाकडून किंवा आमच्या विभागाकडून लाडकी बहीण योजनेच्या केवायसीसंदर्भात कोणतेही आदेश प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे महिलांनी अधिकृत सूचना मिळेपर्यंत कार्यालयात येऊ नये. तालुका प्रोटेक्शन ऑफिसर किंवा आमच्या अधिकाऱ्यांमार्फत अधिकृत माहिती दिल्यानंतरच पुढील प्रक्रिया सुरू होईल.”

सध्या जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अशा परिस्थितीत महिलांनी उन्हात तासन्तास रांगा लावून स्वतःच्या आरोग्याशी खेळ करू नये, असेही आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. अनावश्यक गर्दीमुळे महिलांना त्रास सहन करावा लागत असल्याचे प्रशासनाने नमूद केले.

दरम्यान, सध्या कार्यालयात येणाऱ्या लाभार्थी महिलांना केवळ आधार क्रमांकाच्या आधारे त्यांच्या अर्जाची सद्यस्थिती तपासून टोकन पद्धतीने माहिती दिली जात आहे. याशिवाय कोणतीही नवीन प्रक्रिया किंवा केवायसी नोंदणी सुरू नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

लाडकी बहीण योजनेबाबत निर्माण झालेल्या संभ्रमाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवण्याचे आवाहन केले असून, महिलांनी अफवांपासून सावध राहून अनावश्यक गर्दी टाळावी, असे सांगितले आहे.


Protected Content

Play sound