यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगांतील अतिदुर्गम आदिवासी भागांमध्ये आरोग्य सुविधा पोहोचवण्यासाठी सावखेडासिम प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे विशेष आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले. जामन्या, गाडऱ्या आणि उसमळी या दुर्गम पाडा गावांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरांना ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विविध आजारांची तपासणी, गर्भवती महिलांची आरोग्य तपासणी, बालकांचे आरोग्य परीक्षण तसेच रक्तदाब आणि मधुमेह तपासणी अशा विविध सेवा शिबिरात उपलब्ध करून देण्यात आल्या.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजू तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर 19 मे रोजी आयोजित करण्यात आले होते. धरती आबा उन्नत ग्राम योजना तसेच ‘माझे गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानांतर्गत या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली. सातपुड्यातील दुर्गम वस्त्यांवर आरोग्य सेवा पोहोचवण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

शिबिरामध्ये नॉन कम्युनिकेबल डिसीज (NCD) अंतर्गत रक्तदाब आणि शुगर तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर आवश्यक रुग्णांना औषधांचे वितरण देखील करण्यात आले. तसेच पॅलिएटिव्ह केअर अंतर्गत गंभीर आणि दीर्घकालीन आजारांनी ग्रस्त रुग्णांच्या भेटी घेऊन त्यांना वैद्यकीय मार्गदर्शन करण्यात आले. ग्रामस्थांना विविध आरोग्य योजनांची माहिती देत “आपले आरोग्य आपल्या हाती” या संकल्पनेवर आधारित आरोग्य शिक्षणही देण्यात आले.
उसमळी येथे बालकांचे लसीकरण करण्यात आले. या संपूर्ण आरोग्य शिबिराचा लाभ एकूण १३५ नागरिकांनी घेतला. दुर्गम भागातील नागरिकांना गावपातळीवर वैद्यकीय सेवा मिळाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
या शिबिरात डॉ. निलेश अग्रवाल, डॉ. उज्वला भंगाळे, डॉ. प्रवीण ठाकरे यांच्यासह वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला. हिराबाई पाडवी, योगिता पाटील, शमीबाई बारेला, आशा वर्कर, हेमंत पवार, पूनम गावंडे, आशा पाटील, पुष्पा पाटील, रेखा बारेला, हनीफ तडवी, हेमांगी फेगडे, नसीम पिंजारी आणि समीम तडवी यांच्यासह आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
सातपुड्यातील दुर्गम आदिवासी भागांमध्ये आरोग्य सेवा प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी अशा शिबिरांची आवश्यकता असून शासनाच्या विविध योजनांद्वारे ग्रामीण व आदिवासी भागातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ करण्यासाठी आरोग्य विभागाकडून सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे या उपक्रमातून दिसून आले.



