जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथे रहिवासी भागात सुरू असलेल्या रासायनिक प्रक्रिया करणाऱ्या कंपनीमुळे ग्रामस्थांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचा आरोप करत नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे. ‘फार्मफ्रेस प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीचा परवाना तात्काळ रद्द करून कंपनीला औद्योगिक क्षेत्रात स्थलांतरित करण्याची मागणी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे. या प्रश्नावर लवकर तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नशिराबाद येथील गट क्रमांक 1036 मधील प्लॉट क्रमांक 37 आणि 38 येथे ‘फार्मफ्रेस प्रायव्हेट लिमिटेड’ या नावाने फळांवर रासायनिक प्रक्रिया करून ज्यूस तयार करण्याचा उद्योग सुरू आहे. या प्रक्रियेदरम्यान वापरण्यात येणाऱ्या रसायनांचा गोड पण तीव्र उग्र वास संपूर्ण परिसरात पसरत असल्याने स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. या दुर्गंधीमुळे अनेक ग्रामस्थांना श्वसनाचे विकार आणि फुफ्फुसाशी संबंधित आजार होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

ग्रामस्थांनी निवेदनात म्हटले आहे की, कंपनीतून दररोज हजारो लिटर सांडपाणी परिसरातच सोडले जात आहे. हे पाणी साचून राहिल्याने दुर्गंधी निर्माण होत असून डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे परिसरातील लहान मुले, महिला आणि वृद्ध नागरिकांना डेंग्यू, मलेरिया यांसारख्या गंभीर आजारांचा सामना करावा लागत आहे. याशिवाय त्वचेचे विकार आणि अंगाला खाज सुटण्याच्या तक्रारीदेखील वाढत असल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले आहे.
सदर जागेला रहिवासी प्रयोजनासाठी अकृषक परवाना देण्यात आलेला असून, त्या ठिकाणी औद्योगिक व्यवसाय चालवणे नियमांचे उल्लंघन असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे निवासी भागातील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या या उद्योगाविरोधात तातडीने कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. कंपनीचा परवाना रद्द करून संबंधित उद्योगाला औद्योगिक क्षेत्रासाठी राखीव जागेत स्थलांतरित करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
या निवेदनावर पंकज शामकांत महाजन, रविंद्र संतोष चौधरी, राहुल सुरेश चौधरी, निवृत्ती वासुदेव कोळी, वैभव संजय गोसावी, मुरलीधर गोविंदा पवार, भूषण कांतीलाल साळुंके, संदीप आनंदा धनगर, भूषण भानुदास कोल्हे आणि संदीप विष्णू पाटील यांच्यासह अनेक ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.



