सतर्क राहून जबाबदारीने मतमोजणी प्रक्रिया पार पाडा – जिल्हाधिकारी

jilhadhikari nivadnuk

जळगाव, प्रतिनिधी । येत्या विधानसभा निवडणूकीच्या मतमोजणीवेळी मतमोजणी पर्यवेक्षक, सहाय्यक व कर्मचारी यांनी सतर्क राहून आयोगाच्या निर्देशानुसार शिस्तीने व जबाबदारीने मतमोजणी प्रक्रिया पार पाडाव्यात अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिल्यात.

यांची होती उपस्थिती
येथील संभाजी राजे नाट्य संकुलात विधानसभा निवडणूक मतमोजणी कामी नियुक्त करण्यात आलेल्या पर्यवेक्षक व सहाय्यक यांचे पहिले जिल्हास्तरीय प्रशिक्षण पार पडले. यावेळी डॉ. ढाकणे उपस्थितांना मार्गदर्शन करतांना बोलत होते. याप्रसंगी निवडणूक निरिक्षक रुपक मुजुमदार, गौरव बोथरा, अपर जिल्हाधिकारी डॉ. नंदकुमार बेडसे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, पाचोरा विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र कचरे, जळगाव शहर मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती दिपमाला चौरे, निवडणूक तहसीलदार बाबासाहेब गाढवे, तहसीलदार (संगांयो) दळवी, नायब तहसीलदार समदाणे, कळसकर यांचेसह मतमोजणी कामी नियुक्त करण्यात आलेले पर्यवेक्षक व सहाय्यक उपस्थित होते.

यावेळी बोलतांना डॉ. ढाकणे म्हणाले की, मतदानासाठी वापरण्यात येणारी सर्व मतदान यंत्रे तपासून स्ट्र्र्राँगरुम मध्ये ठेवण्यात आली आहे. मतमोजणीच्या दिवशी सर्व कर्मचाऱ्यांना आपल्यावर सोपविलेली जबाबदारी पार पाडावी. मतमोजणीच्यावेळी कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही याची दक्षता घ्यावी. काही अडचण उद्भवल्यास तात्काळ निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या निदर्शनास आणून द्यावी. कर्मचाऱ्यांनी कोणत्याही प्रकारचे दडपण न घेता प्रक्रिया सुरळीत व नि:पक्षपातीपणे पार पडेल याची दक्षता घ्यावी. यावेळी निवडणूक निरीक्षक मुजुमदार यांनी उपस्थितांना मतमोजणी प्रक्रियेबाबत भारत निवडणूक आयोगाच्या सुचनांची माहिती दिली.

प जिल्हा निवडणूक अधिकारी हुलवळे प्रशिक्षण वर्गाचे प्रास्ताविक करतांना म्हणाले की, ज्या कर्मचाऱ्यांना मतमोजणी प्रक्रियेत काही शंका, अडचणी असतील तर त्यांनी निरसण करुन घ्यावे. येत्या 23 तारखेला मतमोजणी कर्मचाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण याचठिकाणी पार पडणार असून प्रशिक्षणानंतर लगेचच संबंधितांना त्यांना देण्यात आलेल्या मतमोजणी केंद्रावर रवाना केले जाणार असल्याने त्यांनी तयारीत येण्याच्या सुचनाही दिल्यात. पाचोरा विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी उपस्थितांना मतमोजणीचे प्रात्याक्षिक तसेच आयोगाच्या सुचना मतमोजणी प्रक्रियेवेळी घ्यावयाची दक्षता व करावयाची कार्यवाही याबाबत सादरीकरणाद्वारे प्रशिक्षण दिले. यावेळी उपस्थितांना आयोगातर्फे मतमोजणी प्रकियेचे संगणकीय सादरीकरण दाखविण्यात आले.

Protected Content