क्रेडिट कार्ड ब्लॉक करण्याच्या नावाखाली शेतकऱ्याची ऑनलाईन फसवणूक

 

वरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । हरविलेले क्रेडिट कार्ड ब्लॉक करून देते असे सांगून अज्ञान महिलेने शेतकऱ्याच्या बँक खात्यातून परस्पर १ लाख १६ हजार ४२१ रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत वरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल प्रभाकर वंजारी वय 52 रा. वंजारीवा,डा वरणगाव ता. भुसावळ हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शेती करून आपला उदरनिर्वाह करत असतात. २१ सप्टेंबर दुपारी दीड वाजेच्या सुमारास त्यांना त्यांच्या मोबाईलवर एका अनोळखी महिलेने फोन करून एसबीआय बँकेतून बोलते असे सांगून तुमचे हरविलेले क्रेडिट कार्ड ब्लॉक करून देते असे सांगितले. त्यावर महिलेने अनिल वंजारी यांचा विश्वास संपादन केला. त्यानुसार अनिल वंजारी यांनी त्यांच्या मोबाईलवर आलेला गोपनिय असलेला ओटीपी नंबर दिल्याने काही वेळातच त्यांच्या बँक खात्यातून १ लाख १६ हजार ४२१ रुपये परस्पर काढून घेतल्याचे अनिल वंजारी यांच्या लक्षात आले. त्यांनी या संदर्भात तातडीने वरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर पाटील करीत आहे.

Protected Content