अकलूद फाट्यावर दोन लाखाची रोकड जप्त

रावेर (प्रतिनिधी) लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता अंतर्गत भुसावळनजीकच्या अकलूद फाट्यावर तैनात करण्यात आलेल्या स्थिर सर्व्हेक्षण पथकाच्या झाडाझडीत आज सकाळी एका वाहनातून दोन लाख सात हजार तीनशे रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. भुसावळहून सावद्याकडे जाणारे वाहन मालक तथा सावदा येथील केळी व्यापारी मुकेश भगवानदास लेखवाणी यांच्या वाहनात ही रोकड सापडली असून रावेर कोषागार कार्यालयात जमा करण्यात आली आहे. दरम्यान, विदेशी मद्यसाठ्याची बेकायदेशीर वाहतूक करण्यापाठोपाठ दोन लाख रुपये जप्त केल्यामुळे निवडणुकीत गैरमार्ग अवलंबणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

 

भुसावळ तापी नदी पुलाजवळील अकलूद नाका क्रमांक तीनवर रावेर लोकसभा मतदारसंघातील आचारसंहिता कक्षांतर्गत नियुक्त केलेल्या स्थिर सर्व्हेक्षण पथक वाहन तपासणी करत होते. आज सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास भुसावळहून सावद्याकडे जाणारे केळी व्यापारी मुकेश भगवानदास लेखवाणी यांच्या वाहनाची (एमएच-१९-सीएफ -१२६६) झडती घेताना ५०० रू व १०० रू चलनी नोटांची दोन लाख सात हजार ७०० रूपयांची रोकड आढळली. ही रक्कम केळी मजुरांची मजुरी असल्याचा खुलासा संबंधित केळी व्यापारी मुकेश लेखवानी यांनी केलाय. आदर्श आचारसंहितेचे निर्लेप व निरपेक्षपणे पालन करताना ५० हजार रूपयांपेक्षा जास्त रोकड जवळ बाळगणे बेकायदेशीर आहे. यामुळे संबंधित स्थिर सर्व्हेक्षण पथकाचे प्रमुख रमाकांत एकनाथ चौधरी, पोकॉ किरण चाटे, उमेश सानप, विलास झांबरे, योगेश जावळे व एन.पी. वैराळकर यांनी ही रोख रक्कम जप्त करण्याची कारवाई केली.

 

सोमवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. ही रक्कम रावेर लोकसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा फैजपूर प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांच्याकडे पुढील कार्यवाहीसाठी सादर केली. ही जप्त केलेली रक्कम बंद लिफाफ्यात सिलबंद करून रावेर कोषागार कार्यालयात जमा करण्यात आल्याची माहिती आचारसंहिता कक्षप्रमुख संजय तायडे, प्रवीण पाटील, अतुल कापडे यांनी दिली.

Add Comment

Protected Content