Home Cities अमळनेर जिजाऊ रथयात्रेचे अमळनेरात जल्लोषात स्वागत !

जिजाऊ रथयात्रेचे अमळनेरात जल्लोषात स्वागत !

0
183


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मराठा सेवा संघाच्या वतीने आयोजित वेरूळ ते पुणे या जिजाऊ रथयात्रेचे आज अमळनेर शहरात उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. ३६ दिवसांच्या प्रवासात तब्बल ५ हजार किलोमीटरचा टप्पा पार करत या रथयात्रेचे सुमारे ४ हजार ठिकाणी स्वागत सोहळे झाले. अमळनेरात दाखल होताच नागरिकांनी मोटरसायकल रॅली काढून या यात्रेचे भव्य स्वागत केले.

आज अमळनेरात ४३ अंश सेल्सियस तापमानाचा असह्य उष्मा असतानाही महिलांचा उत्साह उल्लेखनीय होता. जिजाऊंच्या प्रतिमेचा रथ बघण्यासाठी आणि आदरांजली वाहण्यासाठी महिला मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरल्या होत्या. पारंपरिक वेशभूषा आणि जिजाऊंच्या घोषणांनी वातावरण भारून गेले होते.

वेरूळ येथून १८ मार्च रोजी सुरू झालेली ही रथयात्रा विविध गावे आणि शहरांमधून प्रवास करत आज अमळनेरात पोहोचली. अमळनेरातील बळीराजा चौकात या रथयात्रेचे विसर्जन करण्यात आले, त्यानंतर हा रथ पुढील मार्गासाठी धुळ्याकडे रवाना झाला. या रथयात्रेचा समारोप १ मे रोजी पुण्यातील ऐतिहासिक लाल महालात होणार आहे.

या रथयात्रेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाऊ यांच्या कार्याचा आणि विचारांचा प्रसार केला जात आहे. युवकांमध्ये राष्ट्रभक्ती आणि सामाजिक बांधिलकीची भावना जागृत करणे हा या यात्रेचा प्रमुख उद्देश आहे. अमळनेरातील नागरिकांनी दाखवलेल्या उत्साहामुळे आयोजकांनी समाधान व्यक्त केले.


Protected Content

Play sound