Home Agri Trends जपानच्या शिष्टमंडळाची भोकरमधील नाविन्यपूर्ण कांदा शेतीला भेट!

जपानच्या शिष्टमंडळाची भोकरमधील नाविन्यपूर्ण कांदा शेतीला भेट!

0
161


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील भोकर येथे ॲडव्होकेट सचिन पवार यांच्या नाविन्यपूर्ण कांदा शेतीची पाहणी करण्यासाठी जपानमधील उच्चस्तरीय शिष्टमंडळाने विशेष भेट दिली. कांदा शेतीवर अभ्यास करण्यासाठी आलेल्या या विदेशी पाहुण्यांनी पवार यांच्या शेतीमधील आधुनिक तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन पद्धतींची माहिती घेतली.

जपानमधील यासुमा कंपनी लि.जपानचे संचालक कियोशी काटो, महाव्यवस्थापक तकाशी इशिकावा, सहायक व्यवस्थापक युमी वातानाबे, सहायक गटनेता हिरोयुकी होरीकावा आणि DKSH कंपनी जपानचे व्यवस्थापक शिरीची इचिमुरा यांनी आज भोकर येथे सचिन पवार यांच्या शेताला भेट दिली. या वेळी त्यांनी कांदा पिकाची लागवड, त्याची निगराणी आणि काढणी यांसारख्या विविध टप्प्यांची सखोल माहिती जाणून घेतली. पवार यांनी आपल्या शेतीत वापरलेल्या नवीन पद्धती आणि तंत्रज्ञान याबद्दल विदेशी पाहुण्यांना विस्तृत माहिती दिली.

यानंतर, जपानचे पाहुणे ॲडव्होकेट पवार यांच्या निवासस्थानी गेले, जिथे विविध कृषी तंत्रज्ञानावर सविस्तर चर्चा आणि माहितीची देवाणघेवाण झाली. पवार यांनी भारतीय आणि महाराष्ट्रीयन संस्कृतीचा मान राखत सर्व विदेशी मान्यवरांचा तसेच ज्यांच्या प्रयत्नातून ही भेट शक्य झाली, त्या जैन समूहाच्या अधिकाऱ्यांचा रुमाल, टोपी, नारळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. पवार आणि त्यांच्या कुटुंबियांनी मिळून केलेल्या या आदरातिथ्याने विदेशी पाहुणे अत्यंत प्रभावित झाले आणि त्यांनी लवकरच पुन्हा भेट देण्याची इच्छा व्यक्त करत निरोप घेतला.

या महत्त्वपूर्ण भेटीच्या वेळी जैन फार्म फ्रेश मार्केटिंग विभागाचे प्रमुख रोशन शहा, करार शेती विभागाचे प्रमुख गौतम देसार्डा, श्रीराम पाटील तसेच भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रभाकर पवार आणि पवार यांचे कुटुंबीय व सहकारी उपस्थित होते. गावात विदेशी पाहुण्यांचे आगमन झाल्यामुळे भोकर आणि परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय शेतीतील नवीन प्रयोग आणि क्षमतांची दखल घेतली जात असल्याबद्दल शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.


Protected Content

Play sound