महिलेची चार लाखांच्या दागिन्यांची लांबवली पर्स

जळगाव प्रतिनिधी । गर्दीचा फायदा घेऊन एका महिलेची चार लाखांचे दागिने असणारी पर्स लांबविण्याचा प्रकार येथील बस स्थानकात घडला.

याबाबत वृत्तांत असा की, प्रमिला विकास बोंडे (वय ५२, रा. पोस्टल कॉलनी खंडवा) ही महिला गुरूवारी दुपारी तिची नणंद भारती किशोर महाजन यांच्यासोबत बामणोद येथून जळगावात सोने खरेदीसाठी आल्या होत्या. सोने खरेदी केल्यानंतर सायंकाळी ७.१५ वाजेच्या सुमारास त्या बामणोद येथे जाण्यासाठी नवीन बसस्थानकावर पोहोचल्या. त्या दोघी जळगाव-भुसावळ बसमध्ये बसल्या. परंतु, गर्दी असल्याने त्या बसमधून खाली उतरल्या. त्यानंतर जळगाव-कठोरा या बसमध्ये दोघी बसल्या. दरम्यान, बसमध्ये बसत असताना बोंडे यांना त्यांच्याजवळील लाल रंगाच्या बॅगची चैन उघडी असल्याचे दिसले. त्यांनी तत्काळ बॅगमधील दागिने तपासले. त्यावेळी बॅगमध्ये ठेवलेली दागिने ठेवलेली पर्स दिसली नाही. गुरूवारी खरेदी केलेले सोने मात्र त्यांना आढळून आले. तर गुरूवारी खरेदी केलेल्या सोन्यापैकी चार ग्रॅमची अंगठी पर्समधील पूर्वीच्या सोन्यामध्ये त्यांनी ठेवली होती. ती अंगठीही त्यांना आढळली नाही. बोंडे यांच्या पर्समध्ये ३० हजार रूपये किमतीची १२ ग्रॅम वजनाची सोनसाखळी, १ लाख ५० हजार रूपये किमतीचे ५ तोळ्याचे मंगळसूत्र, ३० हजार रूपये किमतीचे १ तोळ्याचे कानातील टॉप्स, १ लाख ८० हजार रूपये किमतीचे ७ ग्रॅम वजनाचे कानातील ९ जोड टॉप्स, १३ हजार ६०० रूपये किमतीची ४ ग्रॅम वजनाची अंगठी, ९ हजार किमतीची ३ ग्रॅम वजनाची अंगठी या दागिन्यांसह रोख ६ हजार रूपये असा एकूण ४ लाख १८ हजार ६०० रूपयांचे दागिने होते.

या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Add Comment

Protected Content