अहमदाबाद (वृत्तसंस्था) काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या ‘चौकीदार चोर है’ या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवर स्वत:च्या नावापुढे चौकीदार शब्द जोडला. यानंतर भाजपाच्या केंद्रीय मंत्र्यांनी, खासदार, आमदार आणि नेत्यांनी नावापुढे ‘चौकीदार’ शब्द लावला. भाजपाच्या या सोशल मीडिया कॅम्पेनला आता पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी उत्तर दिले आहे. त्यांनी ट्विटरवर स्वत:च्या नावापुढे बेरोजगार शब्द जोडला आहे. त्यामुळे आता ट्विटरवर त्यांचे नाव बेरोजगार हार्दिक पटेल असे झाले आहे.
२०१४च्या निवडणुकांमध्ये मी देशाचा पंतप्रधान नव्हे तर चौकीदार म्हणून काम करेन, अशी भावनिक हाक मोदींनी अनेक प्रचारकी भाषणांमधून दिली होती. निवडणुकीनंतरही आपण चौकीदार असल्याचे मोदी सांगत आहेत. तेव्हा मोदींच्या या वक्तव्याचा वापर करून ‘चौकीदारही चोर है’ अशी एक अघोषित चळवळ कांग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी सुरू केली. ‘चौकीदारही चोर है’ हे हॅशटॅग ट्विटरवर प्रचंड व्हायरल झाले. त्यालाच उत्तर म्हणून मोदींनी ‘मै भी चौकीदार’ मोहीम सुरू केली. त्यानंतर आता मोदी आणि भाजपाच्या चौकीदार कॅम्पेनला उत्तर देण्यासाठी हार्दिक पटेल यांनी बेरोजगार शब्दाचा वापर केला. देशातील बेरोजगारीचा विषय उपस्थित करण्यासाठी हार्दिक यांनी ट्विटरवर स्वत:च्या नावापुढे बेरोजगार शब्द जोडला. अनेकांनी हार्दिक यांनी नावात केलेल्या बदलाचे समर्थन केले आहे. दोन कोटी तरुणांना रोजगार देण्याचे आश्वासन मोदींनी 2014 मध्ये निवडणूक प्रचारादरम्यान दिले होते.