धावत्या एक्सप्रेसला लटकलेल्या आजी-नातीचे वाचवले प्राण; चाळीसगाव स्थानकावरील थरार

बबन पवार

चाळीसगाव प्रतिनिधी । येथील सामाजिक कार्यकर्ते बबन पवार यांनी आज सकाळी वाराणसी एक्सप्रेसला लटकलेल्या आजी व नातीला वाचवले. हा थरार चाळीसगाव स्थानकावरील प्रवाशांनी अनुभवला.

याबाबत वृत्त असे की, आज सकाळी पावणे आठ वाजता मुंबई कडे जाणारी अप सुपरफास्ट वाराणशी एक्सप्रेस चाळीसगांव येथे सिग्नल नसल्याने काही सेकंद थांबली होती. तेवढ्यात जिन्यावरून एका महिलेने आपल्या नातीसोबत गाडीत बसण्याचा प्रयत्न केला. मात्र वयोवृध्द आजीला गाडी सुरू झाल्याचा अंदाज आला नाही तिने घाईत गाडीचा दरवाजा जवळच्या पाईपला धरून नातीला गाडीत घेण्याचा प्रयत्न केला मात्र तो पर्यंत गाडीने बर्‍यापैकी वेग घेतला होता. गाडीत गर्दी असल्याने दरवाज्याजवळच आजी नाती लटकले होते. यामुळे यावेळी पलाट क्रमांक तीन वर उभे असलेल्या प्रवाशांचा काळजाचा ठोका चुकला होता आता आजी नातीला देवच वाचवेल अशी अवस्था बघ्यांची झाली होती. अनेकांनी मोठयाने आरोळ्या द्यायला सुरुवात केली व गाडी धांबविण्यासाठी गोंगाट केला. मात्र पवार वाडीतील सामाजिक कार्यकर्ते बबन पवार यांनी यावेळी मोठ्या हिमतीने गर्दीतून सरळ सरळ आजी लटकलेल्या बोगीकडे धाव घेतली. आणि आजीला व नातीला धरून गाडीतून ओढले. यावेळी संबंधीत महिलेच्या पायाला तर बबन पवार यांच्या हाताला जखम झाली.

अगदी काही सेकंदांमध्ये घडलेल्या थराराचा अनेकांनी अनुभव घेतला. उपस्थित शेकडो प्रवाश्यांनी बबन पवार यांच्या धाडसाचे कौतुक केले आहे. गाडीला लटकलेल्या अवस्थेत असलेली आजी नातू हे काही सेकंदात गाडी खाली आले असते आणि जीव गमावून बसले असते देवदूत सारखे धावून आलेले बबन पवार यांचे हिमतीने दोघांचे प्राण वाचले आहे.यावेळी प्रकाश जाधव व मनोज पाटील यांनी त्यांना धीर दिला.या घटनेची प्रवाशांमध्ये चर्चा दिसून आली.

Add Comment

Protected Content