महाराष्ट्राला उत्तर प्रदेशपेक्षाही जास्त लसी मिळाल्या आहेत” — फडणवीस

 

 

नागपूर : वृत्तसंस्था ।  विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला उत्तर प्रदेशपेक्षाही जास्त लसी मिळाल्या आहेत सांगत टीकाकारांना उत्तर दिलं आहे. ते नागपुरात पत्रकारांशी बोलत होते.

 

 

महाराष्ट्रात तीन दिवस पुरेल इतकाच कोरोना लसींचा साठा शिल्लक असल्याची माहिती  आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. त्यांनी केंद्राकडून गरज आहे तितक्या वेगात  पुरवठा होत नसल्याचंही म्हटलं. यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी राज्य सरकारवर निशाणा साधत कोरोना आटोक्यात आणण्यात आलेल्या अपयशावरून लक्ष विचलित करण्यासाठी काही राज्ये लशीचा तुटवडा असल्याची नाहक भीती निर्माण करत असल्याचं म्हटलं.

 

“आरोग्यमंत्र्याचं पत्र काल आपल्या सर्वांपर्यंत पोहोचलं आहे. महाराष्ट्र सरकारने लसीचं राजकारण बंद केलं पाहिजे, लोकांच्या जीवाशी खेळणं बंद केलं पाहिजे. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला झालेल्या लसींच्या पुरवठ्यासंबंधीची आकडेवारी दिली आहे. टीका करणाऱ्यांनी हे पाहिलं पाहिजे की, महाराष्ट्रापेक्षा जवळजवळ दुप्पट लोकसंख्या असणाऱ्या उत्तर प्रदेशपेक्षाही जास्त लसींचा पुऱवठा राज्याला करण्यात आला आहे,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

 

“सचिन वाझे यांनी लिहिलेलं पत्र गंभीर असून त्यात लिहिलेल्या गोष्टी आपल्या सर्वांना विचार करायला लावणाऱ्या आहेत. महाराष्ट्रात जे घडत आहे ते राज्य आणि पोलिसांच्या प्रतिमेसाठी चांगलं नाही. उच्च न्यायालयाने सीबीआयला चौकशी करायला सांगितलं असून पत्र वैगेरे ज्या गोष्टी समोर येत आहेत त्याची त्यांनी किंवा संबंधित यंत्रणेने चौकशी करावी. अशा प्रकारचं पत्र आल्यानंतर त्यांसदर्भातील चौकशी होऊन दूध का दूध आणि पानी का पानी झालं पाहिजे. चौकशी होऊन सत्य  बाहेर आलं पाहिजे. अन्यथ डागाळलेली प्रतिमा पुन्हा नीट होणार नाही,” असं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं.

 

“सरकारने रेमडेसिवीरच्या बाबतीत  लक्ष देण्याची गरज आहे. काळाबाजार कसा होतो हे आपण पाहिलं असून सध्याही तीच परिस्थिती आहे. दुसरी लाट आहे ती देशातील सर्व राज्यांमध्ये नाही. मागील लाट सगळीकडे होती. त्यामुळे राज्यांनी जिथे लाट नाही तेथून रेमडेसिवीर घेता येईल का याकडे लक्ष दिलं पाहिजे. उत्पादन करणाऱ्या वेगवेगळ्या कंपन्यांशी चर्चा करुन जास्तीत जास्त पुरवठा कसा होईल आणि काळाबाजार होणार नाही हे पाहिलं पाहिजे. काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई केली पाहिजे,” असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.

Protected Content