संत, संप्रदाय व समाजातील सेतू महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज

janardan maharaj 1

आज दिनांक २८ ऑगस्ट रोजी महामंडलेश्‍वर स्वामी श्री जनार्दन हरीजी महाराज यांचा अवतरणदिन. त्यानिमित्त त्यांच्या देदीप्यमान जीवनकार्याचा घेतलेला हा आढावा.

महामंडलेश्‍वर श्री जनार्दन हरीजी महाराज यांनी सर्व संत, महंत व संप्रदायांना संघठीत करून एकात्मतेसाठी मोलाचे कार्य केले आहे. ते सर्वच संत, महंत, संप्रदाय व समाजातील समरसतेसाठी सेतूचे कार्य करीत आहेत. सर्व संप्रदायात जे खेळीमेळीचे वातावरण आज बघायला मिळते त्याचे श्रेय महाराजांनाच जाते. २९ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०११ या कालखंडात आयोजित संत संमेलनाच्या माध्यमातून त्यांनी फैजपूर व खान्देशचे नाव देश विदेशात पोहचवले. महाराजांची क्षमता व कार्य किती अफाट आहे याची जाणीव त्या संमेलनाच्या माध्यमातून सर्वांनी अनुभवली. आजही त्या महोत्सवाची आठवण झाली कि रोमांच उभा राहतो. डोळ्याचे पारणे फिटावे असा तो भव्य दिव्य ऐतिहासिक सोहळा ठरला. महाराजांचे समरसतेचे हे कार्य भारतात व विदेशातही अविरतपणे सुरु आहे. इंग्लंड व अमेरिकेसारख्या देशात प्रतिवर्षी प्रवास करून तेथील भारतीयांमध्ये सुद्धा संस्कार-संस्कृतीची, समरसतेची ज्योत प्रज्वलित करण्याचे काम महाराज करीत आहेत. महाराजांच्या विदेशातील या कार्यामुळे तेथील भारतीय भाविकांमधेही चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, धर्मकार्य करीत असताना समाजकार्य, राष्ट्रकार्य सुद्धा तेव्हढेच महत्वाचे आहे असे समजून महाराजांनी महत्वाची भूमिका निभावली आहे. युवकांसाठी च्या संस्कार शिबिरांतून व्यसनमुक्ती वर त्यांनी केलेलं कार्य विशेष उल्लेखनीय आहे. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत जाण्याचा त्यांचा प्रयत्न अभिनंदनीय आहे. महामंडलेश्‍वर पदाचा वृथा अभिमान न बाळगता ते समाजहितासाठी झटत आहेत. सत्याच्या पाठीशी मजबुतीने उभे राहणे हा महाराजांचा स्वभाव आहे. संप्रदायात किंवा समाजात तेढ निर्माण होऊ नये यासाठी महाराज सदैव प्रयत्नशील असतात. आदर्श समाजाचे निर्माण फक्त उपदेशातून होणार नाही तर त्यासाठी कृती केली पाहिजे असे महाराजांचे नेहमी सांगणे असते. अनेकानेक उपक्रमाच्या माध्यमातून त्यांनी ते सिद्ध केले आहे. सावदा येथील समाजसेवक बाबुशेठ यांचा सत्कार, कु. मोहिनी चव्हाण परिवारासाठी घराचे बांधकाम, दर बुधवारी दरिद्र नारायणासाठी अन्नदान, गोवंश रक्षणाची जबाबदारी, स्वस्त दरात वह्यांची उपलब्धता, संगीत विद्यालय, सफाई कर्मचार्‍यांचा सत्कार, रक्ततुला आदींसारख्या कार्यक्रमाचे आयोजन करून त्यांनी समाजाला दिशादर्शक असे काम केले आहे.

जनार्दनाय सेवा संस्थानच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली तरुणाई अनेक सेवाभावी उपक्रम राबवित आहे , गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, शाळांना अध्ययन पूरक साहित्य उपलब्ध करून देणे, वृक्ष लागवड करून संगोपनाची जबाबदारी घेणे, स्पर्धा परिक्षांचे आयोजन करणे असे अनेक उपक्रम निश्‍चितच समाजोपयोगी ठरत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे २०१३-१४ चा महात्मा गांधी व्यसनमुक्ती पुरस्कार, तंटामुक्ती कार्य व सामाजिक सलोखा राखल्याबद्दल जळगाव जिल्हा पोलीस दल यांच्या तर्फे सन्मानपत्र देऊन त्यांना गौरवान्वित केले आहे यासह अनेक सामाजिक संस्थांनी सुद्धा विविध पुरस्कार देऊन महाराजांचा सन्मान केलेला आहे. तसेच ते आज महाराज अखिल भारतीय संत समितिचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष पद यशस्वीपणे सांभाळत आहेत.

या वर्षी सातपुड्याच्या पायथ्याशी थेंब अमृताचा या योजनेमार्फत १७ नद्यांच्या मध्ये पावसाचे पाणी अडवण्याचे जे मोलाचे कार्य पार पडले त्यात जनार्दन महाराजांची महत्वाची भूमिका होती. महाराजांनीच सर्व संत, पक्ष व समाजाला जोडण्याची अपेक्षा आमदार हरिभाऊ जावळे यांच्यासमोर व्यक्त केली होती. यानंतर हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला आहे. आपण आज बघतो आहे कि ऐतिहासीक असे कार्य घडले आहे. पाण्याअभावी भिषण दुष्काळाची अवस्था निर्माण झाली असताना जलक्रांती योजनेने संजीवनी देण्याचे कार्य केले आहे. २८ ऑगस्ट रोजी प.पू. महामंडलेश्‍वर स्वामी श्री जनार्दन हरि जी महाराज यांचा हा ४१वा अवतरणदिन त्यानिमित्त महाराजांच्या अफाट अशा कार्याला वंदन करून महाराजांना प्रकट दिनानिमित्त विनम्र अभिवादन. धर्मकार्य, समाजकार्य व राष्ट्र कार्यासाठी त्यांना निरामय दीर्घायुष्य लाभो हीच परमेश्‍वराकडे प्रार्थना !

शब्दांकन:- शैलेंद्र प्रकाश महाजन (भुसावळ)

Protected Content