स्वयंप्रकाशित अपराजीत योध्दा : आ. गिरीश महाजन ! (ब्लॉग)

राज्याचे माजी जलसंपदा मंत्री तथा विद्यमान आमदार गिरीश महाजन यांचा आज वाढदिवस. यानिमित्त त्यांचे जवळपास ३७ वर्षांपासूनचे स्नेही तथा स्वेच्छानिवृत्त अभियंता एम. एम. पाटील यांनी त्यांच्या कार्याचा घेतलेला हा सविस्तर आढावा आपल्यासाठी सादर करत आहोत.

गल्ली पासून दिल्ली पर्यंतच्या राजकारणावर आज जात-धर्म, घराणेशाही, पैसा या घटकांचा मोठा प्रभाव आहे. आज या क्षेत्रात स्पर्धा आणि अनिश्‍चितता इतकी प्रचंड वाढली की भले भले संस्थानिक, तालेवार घराणी, राजेरजवाडे यांचे वंशज, अब्जाधीश यांनादेखील निवडून येण्याची शंभर टक्के खात्री देता येत नाही. अशा पार्श्‍वभूमीवर सामान्य शिक्षकाचा मुलगा पस्तीशीत पहिल्यांदा आमदार होतो त्यानंतर सलग सहा वेळा निवडून येतो, आज अनेक नवोदित आणि प्रस्थापित नेत्यांच्या भवितव्याचा फैसला तो करतो, देशातील सर्वोच्च ताकदवान नेत्यांच्या गुड बुक्स मध्ये त्याला स्थान मिळते… हे सारेच काही विलक्षण होय ! ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगरपालिका, विद्यापीठ, सहकार अश्या विविध क्षेत्रातील गेल्या तीस वर्षात एकाही निवडणुकीत ज्याने पराभव पाहिलेला नाही असे सामान्यातील असामान्य नेतृत्व म्हणजे गिरीश दत्तात्रय महाजन !

महाविद्यालयीन जीवनात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अर्थात अभाविपच्या माध्यमातून या प्रवासाची सुरुवात झाली ती साधारणत: १९८० ते ८२ च्या दरम्यान ! तेव्हापासून आजतागायत गिरीश भाऊ भाजपाशी एकनिष्ठ आहेत. चाळीस वर्षात त्यांची पक्षनिष्ठा वादातीत आहे. गिरीश भाऊंनी पहिल्यांदा विधानसभेसाठी तिकिटाची मागणी केली ती १९९० मध्ये पण त्यावेळेस प्रयत्न फार सिरीयस नव्हते. तशी तिकीटासाठी फारशी स्पर्धाही नव्हती कारण भाजपच्या तिकिटावर निवडून येण्याची खात्री नव्हती.

१९९० ला गिरीश महाजन यांच्याच गुजर या अल्पसंख्य समाजाचे दत्तात्रय उघडू महाजन हे काँग्रेसच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले होते. दत्तात्रय महाजन यांच्या गळ्यात अनपेक्षितपणे काँग्रेसच्या उमेदवारीची माळ पडली आणि अटीतटीच्या लढतीत प्रल्हादराव एकनाथराव पाटील (तत्कालीन शिखर बँकेचे चेअरमन) आणि डॉक्टर मनोहर गजमल पाटील यांचा पराभव करून दत्तात्रय महाजन निवडून आले. सर्वसाधारणपणे विद्यमान आमदार/ खासदार यांचे कार्य चांगले असेल तर पुढील तिकिटासाठी त्यांची दावेदारी मजबूत असते परंतु जामनेर विधानसभेची पुढील निवडणूक ईश्‍वरबाबूजी जैन लढणार हे निश्‍चित होते.

भारतीय मतदारांना राजे/संस्थानिक आणि फकीर अशांविषयी विशेष ममत्व असते. जामनेर विधानसभेच्या १९९५ च्या निवडणुकीचे स्वरूप संस्थानिक विरुद्ध फकीर असेच होते. ईश्‍वरबाबूजी म्हणजे जिल्ह्याच्याच नव्हे तर राज्याच्या राजकारणातील मोठे प्रस्थ. आजोबा श्री राजमल लखीचंद यांचा राजकीय आणि सोन्या-चांदीच्या व्यवसायाचा वारसा, जामनेर तालुक्यात हजारो एकर जमीन, शिवाय एक वेळा जळगाव मधून आणि एक वेळा जामनेर मधून आमदार म्हणून निवडून आलेले, तालुक्यातील बहुतांश सहकारी संस्था व ग्रामपंचायती ताब्यात, पंचायत समिती ताब्यात आणि या सोबत स्वच्छ प्रतिमा अशा सर्व जमेच्या बाजू बघता बाबुजींचं पारडं जड होतं.

दुसरीकडे गिरीश भाऊ म्हणजे सामान्य परिवारातील सामान्य कार्यकर्ता, एखाद्या हिंदी सिनेमातील हिरो सारखे आकर्षक व्यक्तिमत्व, अन्याय करणार्‍याला बदडून काढणारा, मारायला आणि मरायला न घाबरणारा, गरीबांचा कैवारी, तरुणांच्या गळ्यातील ताईत… असे १९९५ च्या लढतीचे चित्र होते. यात गिरीशभाऊंनी बाबूजींना पराभूत करून आपला विजयरथ सुरू केला, जो आजवर अव्याहतपणे गतीने धावतच आहे.

आज आपण चर्चा करतो ती यशस्वी लोकांची, वेगवेगळ्या क्षेत्रात टॉपला गेलेल्या लोकांची. परंतु यांचा सुरुवातीचा संघर्षाचा काळ, केलेले कष्ट आपल्याला दिसत नाहीत. विशेषतः राजकीय क्षेत्रात जेव्हा एखादी व्यक्ती टॉपला जाते त्याच्या मागे हजार लोक अपयशी झालेले देखील असतात किंबहुना राजकारणापायी सर्वस्व गमावलेले अनेक लोक आपल्या आसपास आपल्याला दिसतील. संघर्षाच्या या प्रोसेस मधून भाऊंना देखील जावे लागले आहे.

कौटुंबिक पार्श्‍वभूमी

गिरीश भाऊंचे वडील स्व. डी बी महाजन सर, ज्यांना आम्ही दादा म्हणत असू, हे पुण्याहून बी.एस्सी. अ‍ॅग्री झालेले. जामनेर गावालगत सरांची बागायत शेती होती, दादा उत्तम शेती करत. त्यासोबतच जामनेरला माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून अत्यंत शिस्तप्रिय आणि कडक स्वभावाचे शिक्षक असा त्यांचा लौकिक होता. अत्यंत देखणे निर्व्यसनी व शाकाहारी अशा दादांकडून भाऊंना याच गोष्टी वारशात मिळाल्या आहेत. दादांची इच्छा भाऊंनी ग्रॅज्युएट व्हावं, शेती करावी आणि जमल्यास शाळा किंवा कॉलेजात शिक्षकाची/प्राध्यापक म्हणून नोकरी करावी अशी होती. पण भाऊंचे टारगेट वेगळेच होते. भाऊ कायम मित्र-मैत्रिणींच्या गराड्यात, गणेशोत्सव, नवरात्र उत्सव, होळी, बारागाड्या, कुस्त्यांची दंगल, क्रिकेट मॅचेस, जन्माष्टमी अशा अ‍ॅक्टीव्हिटी मध्ये कायम बिझी. दादांच्या दृष्टीने ही सगळी रिकामी कामं, त्यामुळे दादांचे आणि भाऊंचे कधीच पटले नाही.

एक मजेशीर किस्सा गिरीश भाऊ सांगतात… दादांकडे पुण्याहून त्यांची काही मित्रमंडळी जामनेरला भेटायला आली होती. भाऊ त्यावेळेस दुसर्‍यांदा आमदार म्हणून निवडून आलेले होते. दोन-तीन खोल्यांचे घर असल्याने शेजारच्या रूम मध्ये भाऊंच्या कानावर त्यांच्या गप्पा पडत होत्या. दादा त्यांच्या मित्रांना सांगत होते, सगळं चांगलं आहे. सून, जावई, नातवंड खूप चांगले आहेत, काळजी घेतात. फक्त एकच खंत आहे, मुलगा वाया गेला!

आता घरातून खुद्द वडिलांचा असा सपोर्ट असल्यावर राजकारण म्हणून करिअर करताना सुरुवातीचा संघर्ष किती कठीण असेल याची थोडीतरी कल्पना यावी. बाकी सौ. साधना वहिनींचा सुरुवातीला खूप पाठिंबा नसला तरी विरोध देखील नव्हता. वहिनींवर दादांची, दोघा मुलींची, नातेवाईक, पै पाहुणे यांची जबाबदारी होती आणि यातून त्यांना वेळच मिळत नसे.

जामनेरला निवास असण्याचा लाभ

जामनेर तालुका आणि जामनेर विधानसभा मतदारसंघ याचे भौगोलिक कार्यक्षेत्र एकच होते. (नंतर पुनर्रचनेत पाचोरा तालुक्यातील एक जिल्हा परिषद गट जामनेर विधानसभा मतदारसंघाला जोडण्यात आला.) संपूर्ण जामनेर तालुक्यातील नागरिकांना शासकीय कामानिमित्त तहसील कार्यालय, पंचायत समिती, पोलीस स्टेशन, कोर्ट, बँका, हायस्कूल-कॉलेज, मार्केट कमिटी, दवाखाने, किराणा व इतर बाजार, इत्यादी कामानिमित्ताने जामनेर ला यावे लागत असे.

शासकीय कार्यालयात बर्‍याच वेळा सर्वसामान्य जनतेची अडवणूक होत असे किंवा वारंवार चकरा माराव्या लागत. अशा वेळेस तक्रार घेऊन लोक गिरीश भाऊंना भेटत. सकाळी पहिली बस जामनेरला आल्यापासून भाऊंकडे लोकांची रीघ लागत असे. प्रत्येकाचे म्हणणे ऐकून संबंधित कार्यालयात फोन करून भाऊ संबंधित अधिकार्‍याला योग्य भाषेत समज देऊन काम मार्गाला लावत. कधी एखाद्या कार्यकर्त्याला त्या व्यक्तीसोबत कार्यालयात पाठवून अडचण सोडवण्यात मदत करीत, अगदीच नाठाळ अधिकारी असेल तर आपल्या खास पद्धतीने त्याचा समाचार घेतला जाई. तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला गार्‍हाणी मांडण्यासाठी हमखास भेटणारा आणि मदत करणारा हक्काचा माणूस म्हणून गिरीश भाऊंचा लौकिक वाढू लागला.

हळूहळू वैयक्तिक भांडणे, कौटुंबिक भांडणे, शेतीच्या बांधावरील भांडणे, दादागिरी, मारामार्‍या यांचा निवाडा भाऊंकडे होऊ लागला. धर्मवीर आनंद दिघे यांच्या दरबारा विषयी आजही अनेक किस्से ऐकायला मिळतात तश्याच प्रकारे गिरीश भाऊंकडे सुद्धा गेल्यात तीस वर्षापासून लोक समस्या घेऊन येतात आणि भाऊ त्यावर मार्ग काढून वाद मिटवतात. असा दरबार ही नित्याची बाब झाली आहे.

भाऊंचे राजकीय विरोधक ईश्‍वरबाबूजी जैन यांचा रहिवास जळगावला दुसरे राजकीय विरोधक संजय गरुड यांचा रहिवास शेंदुर्णीला तर तिसरे प्रमुख विरोधक दिगंबर पाटील यांचा रहिवास तोंडापूर येथे असल्याने त्यांच्याकडे कामे घेऊन जाणारे लोक मर्यादित होते. गिरीश महाजन यांचा रहिवास जामनेरला असणे हा जनसंपर्काच्या दृष्टीने खूप प्रभावी मुद्दा ठरला. अर्थात यात कुटुंबाची प्रचंड गैरसोय झाली. तीन खोल्यांचे घर, घरात कायम पन्नास शंभर लोक, दाराशी शंभर दोनशे लोक यामुळे प्रायव्हसी अजिबात नव्हती किचनच नव्हे तर बेडरूम पर्यंत लोक धडकायचे. प्रिया आणि श्रेया या दोन्ही मुलींचा मुक्काम वरच्या मजल्यावर रजनी काकू आणि जे. के. काकांकडे असे. लोकसेवेच्या या वेडापायी कुटुंबाला भाऊंना वेळच देता आला नाही एक प्रकारे मोठी किंमत त्यांनी आणि कुटुंबाने मोजलेली आहे.

अस्वस्थ कालखंड

१९९० ते १९९५ हा एकूणच देशाच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवणारा कालखंड होता. (याच काळात भाजपचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला.) मंडल आयोग, बाबरी मशिदीचा विध्वंस, राजीव गांधी यांची हत्या, धार्मिक दंगली अशा घटनांनी सामाजिक व राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. भाजपचे अनेक नेते मोर्चे, आंदोलन, जाहीर सभा या माध्यमातून जनतेपर्यंत पक्षाची विचारधारा, ध्येयधोरणे पोचवायचा प्रयत्न करीत होते. त्यात जळगाव जिल्ह्यात एकनाथराव खडसे, डॉक्टर गुणवंतराव सरोदे, गिरीश महाजन, हरिभाऊ जावळे ही मंडळी आघाडीवर होती.

गिरीशभाऊंच्या पाठीशी खंबीरपणे उभे असणारे प्रमुख नेतेमंडळी आज आठवतात ती म्हणजे डॉ अविनाश आचार्य, मेंडकी काका. मित्रपरिवारा पैकी… शिवाजी सरोदे, यशवंतभाई पटेल, डॉ गुरुमुख जगवाणी, भगत भाई बालाणी, डॉ राजेंद्र फडके, सुनील झवर, कैलास अप्पा सोनवणे आदी. तालुक्यात भाजपच्या टीम मध्ये प्रमुख नेते होते… हरिभाऊ बारी, बाबुराव घोंगडे, राजधर पांढरे, दिगंबर बारी, उत्तमराव थोरात, प्रकाश झवर, व्ही पी पाटील सर, डॉ सुरेश मन्साराम पाटील, शिवाजी नाना सोनार, शंकर मराठे, शेरू काझी, नारायण गुजर, दिलीप खोडपे… शिवाय सतिष शर्मा, रमेश नाना, छगन भाऊ झालटे, कैलास शर्मा, जे के चव्हाण, एम एम पाटील ही गिरीष भाऊंची खास मित्रमंडळी… अशी टीम होती.

मोर्चे, आंदोलन, गर्दी जमवणे, रॅली काढणे या कामात गिरीश भाऊंना फार उत्साह, शिवाय २४ बाय ७ यासाठी उपलब्धता, सोबत कार्यकर्त्यांची टीम, या बळावर त्यावेळेस राज्यस्तरावरील प्रमुख नेते प्रमोदजी महाजन, गोपीनाथराव मुंडे, नितीनजी गडकरी, ना. स. फरांदे, सूर्यभान वहाडणे, अण्णा डांगे, शोभाताई फडणवीस या नेत्यांशी जवळीक निर्माण झाली. राजकीय आंदोलनासाठी २४ तास उपलब्ध असलेल्या तरुण उत्साही निर्व्यसनी, ऊर्जावान कार्यकर्त्याची पोकळी गिरीश भाऊ यांनी भरून काढली.

राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांच्या खानदेश किंवा महाराष्ट्र दौर्‍यात आपल्या कार्यामुळे व व्यक्तिमत्त्वामुळे गिरीश भाऊ अटल बिहारी बाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, सुषमा स्वराज, नरेंद्र मोदी, अशा दिग्गज नेत्यांच्या संपर्कात आले आणि एक उत्साही लाघवी, मेहनती, प्रामाणिक, तरुण कार्यकर्ता म्हणून त्यांच्या लक्षात राहिले. तालुका, जिल्हा आणि राज्याच्या पातळीवर पक्षाने सोपवलेली जबाबदारी भाऊंनी समर्थपणे पार पाडल्या आहेत.

निवडणुकांची विजयी सलामी

दीड वर्षाची प्रशासकीय राजवट संपून मार्च १९९२ मध्ये जिल्हा परिषद निवडणुका झाल्या. जामनेर जिल्हा परिषद गटातून गिरीश भाऊंची निवडणूक लढवायची तयारी होती परंतु हा गट महिला राखीव झाला. जामनेर गाव आणि आसपासच्या बारा-पंधरा गावांचा समावेश असलेला हा जिल्हा परिषद मतदारसंघ. गिरीश भाऊ ऐवजी साधना वहिनींनी निवडणूक लढवावी असा कार्यकर्त्यांचा आग्रह ! पण भाऊंची आणि साधना वहिनी दोघांची इच्छा नव्हती. शेवटी साधना वहिनी उमेदवार नसतील तर सीट निवडून येण्याची शक्यता नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आणि साधना वहिनी भाजपचा उमेदवार म्हणून लढल्या आणि निवडून आल्या. ही गिरीश भाऊंच्या परिवारातील पहिली निवडणूक आणि पहिला विजय. या विजयामुळे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेतील कामांना गती मिळाली, अनेक कामे मार्गाला लावायला मदत झाली. या निवडणुकीपासून सुरू झालेली विजयाची परंपरा आज पर्यंत खंडित झालेली नाही.

जामनेर ग्रामपंचायत वर भगवा…एक रोचक विजय

जिल्हा परिषद निवडणुका झाल्यावर वर्षभराच्या आतच जामनेर ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली. गिरीश भाऊंच्या नेतृत्वाखाली भाजपचे पॅनल आणि ईश्‍वरबाबूजी जैन यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे पॅनल अशी सरळ लढत झाली. सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात मतदान झाले. पंधरापैकी गिरीश महाजन यांच्या पॅनलला नऊ जागा मिळून बहुमत मिळाले. या नऊ पैकी दोन सदस्य मुस्लिम समाजाचे निवडून आलेले होते. मतदान होऊन निकाल जाहीर झाले परंतु आधीच्या सरपंचांची पाच वर्ष मुदत संपायला दोन महिने वेळ असल्याने सरपंच निवड लांबणीवर पडली होती आणि याच मधल्या दीड दोन महिन्याच्या काळात बाबरी मशीद पाडल्याची घटना घडली. ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद पाडली त्याप्रसंगी स्वतः गिरीश भाऊ हजार कार्यकर्ते घेऊन अयोध्येला गेले होते. डिसेंबरच्या दुसर्‍या किंवा तिसर्‍या आठवड्यात सरपंच निवड होती. बाबरी मशीद पाडण्याच्या पार्श्‍वभूमीवर मुस्लिम समाजात प्रचंड असंतोष होता त्यातही जी व्यक्ती बाबरी मशीद पाडायला अयोध्येला गेली होती अशी व्यक्ती सरपंच पदासाठी उमेदवार होती आणि अशा व्यक्तीला मुस्लिम सदस्यांनी मतदान करू नये यासाठी किती प्रचंड सामाजिक राजकीय दबाव असेल याची कल्पना आपण करू शकतो. याशिवाय दोघे मुस्लिम सदस्यांना सरपंच व उपसरपंच पदाची खुली ऑफर विरोधी पॅनल कडून देण्यात आली होती परंतु एकही मुस्लिम सदस्य फुटला नाही. अशा अत्यंत अनिश्‍चित व संवेदनशील काळात गिरीश महाजन यांच्या नेतृत्व गुणांची कसोटी लागली पण यातून ते तावून सुलाखून बाहेर पडले आणि सरपंच पदावर विराजमान झाले.

कदाचित सरपंच होण्यासाठी गिरीश महाजन जिवंतच नसते

बाबरी मशीद पाडल्यानंतरची ही घटना आहे. सर्व कारसेवक परतीच्या प्रवासाला निघाल्यानंतर उत्तर प्रदेशातील एका स्टेशनच्या आउटरला ट्रेन थांबली. तेवढ्यात जवळपासच्या एरियातील जमावाने ट्रेन वर दगडफेक सुरू केली. कारसेवकांनी ट्रेनमधुन उतरुन त्यांच्यावर प्रतिहल्ला चढवला. थोड्या वेळात गाडीला सिग्नल मिळाला आणि गाडी सुरू झाली तसे कार सेवक गाडी पकडायला धावले. या धावपळीत आणि धुमश्‍चक्रीत एक कारसेवक जमावाच्या हातात सापडला, तो जीवाच्या आकांताने ओरडतोय पण त्याला वाचवायला जायची कोणीही हिम्मत नव्हती. कारण त्याला वाचवायला जाणे म्हणजे स्वतः मृत्यूला आमंत्रण देणे. अशा परिस्थितीत चित्त्याच्या चपळाईने एक तरुण त्या जमावात शिरला त्या कार सेवकाला कमरेतून उचलला आणि चालत्या ट्रेनचा शेवटचा डबा पकडला यात त्या कारसेवकाला आणि त्याला वाचवणार्‍या तरुणाला भरपूर मार बसला. आपल्या प्राणाची पर्वा न करता अपरिचित कार सेवकाला मृत्यूच्या दाढेतून वाचवणारा तो तरुण होता गिरीश महाजन…!

असाच एक किस्सा जामनेर गावात झालेल्या हिंदू-मुस्लिम दंगली प्रसंगी घडलाय. तेव्हादेखील गिरीश भाऊंनी असेच जमावात घुसून कडू पहिलवान नावाच्या एका कार्यकर्त्याला वाचवला होता. गिरीश भाऊ नसते तर कदाचित त्या तरूणाचे बरे वाईट घडले असते. हे दोन प्रसंग भाऊंच्या धाडसीपणाची, त्यांची रिस्क घेण्याच्या मानसिकतेची, निडरपणाची, स्वतःच्या फिटनेसवर आणि हिमतीवर असलेला आत्मविश्‍वास याची निदर्शक आहेत.

हिंदू मुस्लिम संघर्ष ते सलोखा

जामनेर हे गाव हिंदू-मुस्लीम दंगलीसाठी कुप्रसिद्ध होते. दंगल झाली म्हणजे मुस्लिम आक्रमक होणार आणि हिंदू बचावात्मक पवित्र्यात असे साधारण चित्र असे. गिरीश महाजन मुळात पैलवान गडी. अनेक मैदानी खेळात प्राविण्य मिळवले तसेच कुस्ती, आखाडा, व्यायाम, मल्लखांब हा अत्यंत आवडीचा विषय. आखाड्यातील पन्नास-शंभर तरुणांची टीम हे भाऊंचे हक्काचे कार्यकर्ते दंगलीच्या वेळेस हिंदूंच्या बाजूने धावून आले आणि दंगलीचा नूरच पालटला. जामनेर गावातील हिंदूंना गिरीश महाजन यांची संकटमोचक अशी ओळख कधीच झालेली आहे.
परंतु आज परिस्थिती बदलली आहे. हिंदू-मुस्लिम तणाव राहिलेला नाही. मुस्लिम बहुल एरियात कमळाला देखील मोठ्या प्रमाणात मतदान होत आहे. स्वतः गिरीश महाजन यांना मुस्लिम एरियात मोठा लीड सातत्याने मिळतोय. अलीकडे झालेल्या जामनेर नगरपालिकेच्या सर्वच्या सर्व २४ जागा आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून सौ साधना महाजन अश्या २५ पैकी २५ जागा भाजपच्या निवडून आल्या आहेत. कायदा-सुव्यवस्था, सामाजिक धार्मिक सलोखा असेल तरच आर्थिक व इतर प्रगतीची द्वार उघडतात याचा अनुभव जामनेरची जनता घेत आहे. हिंदू-मुस्लीम असं धार्मिक द्वेषाचं राजकारण न करता भाजपचा उमेदवार निवडून येतो हे जामनेर मॉडेलने सिद्ध केले आहे. कुठलाही जातीय अथवा धार्मिक द्वेष हा मुद्दा निवडणुकीत वापरला जायला नको हे सुदृढ लोकशाहीसाठी आवश्यक आहे.

रुग्णसेवेची तीन दशके

१९९० पासूनच गिरीश भाऊ जळगावची दिवसभराची कामे आटोपल्यावर सायंकाळी जामनेर तालुक्यातील जळगाव सिव्हिल हॉस्पिटल आणि खासगी रुग्णालयात अ‍ॅडमिट असलेल्या पेशंटच्या भेटी घेणे आणि रात्री उशिरा जामनेरला परत येणे असा नित्यक्रम असे. रात्री-बेरात्री, अपघात समयी, नैसर्गिक आपत्ती जसे महापूर, चक्रीवादळ, आग अशा संकटात स्वतः गिरीशभाऊ आणि त्यांचे कार्यकर्ते गेल्या ३० वर्षांपासून मदतीला धावून जात आहेत.

गिरीशभाऊ आमदार झाल्यानंतर मुंबईत उपचारासाठी आलेल्या रुग्णांची महाराष्ट्रात सर्वात जास्त संख्या जामनेर आणि जळगाव जिल्ह्यातून येत असे. जवळपास सर्वच शासकीय रुग्णालयातील डॉक्टर आणि इतर कर्मचारी यांच्याशी गिरीष भाऊ आणि त्यांच्या टीमची जवळीक आहे. रुग्णसेवेसाठी मुंबईत स्वतंत्र वीस-पंचवीस तरुणांची टीम आहे. रुग्णांना वेळीच चांगले उपचार मिळून हजारो रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. अनेक वेळा रुग्णाला त्याच्या गावाहून मुंबईपर्यंत आणणे, मुंबईत उपचार करणे आणि पुन्हा त्याला त्याच्या गावी सोडणे, गरज पडल्यास त्याला समाजसेवी, दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून पैशांची मदत मिळवून देणे ही काम गेल्या तीस वर्षापासून अविरत सुरू आहे.

दुर्दैवाने उपचारादरम्यान रुग्ण दगावल्यास त्याचा मृतदेह गावी पोचवणे, यासाठी अँब्युलन्सची व्यवस्था आणि इतर मदत करणे ही सेवा वर्षानुवर्षे अविरतपणे सुरूच आहे. यात प्रमुख शिलेदार आहे रामेश्‍वर भाऊ नाईक. रामेश्‍वर भाऊंनी रुग्णसेवेसाठी आपलं आयुष्य वाहिलं आहे. रामेश्‍वर भाऊंच्या आधी (साधारण १९९५ ते २००३ या काळात) जामनेरच्या अभय पाटील यांनी ही जबाबदारी अत्यंत समर्थपणे सांभाळली होती. महाराष्ट्रात रुग्ण सेवेच्या बाबतीत आपली स्वतंत्र यंत्रणा असणारे आणि दररोज शेकडो गोरगरिब रुग्णांना विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून मोफत उपचार करणारे गिरीश महाजन हे कदाचित देशातील एकमेव नेते असावेत. वैयक्तिक पातळीवर अडचणीच्या वेळी केलेली मदत याची परतफेड मतपेटीतून व्यक्त होते हा अनेक निवडणुकीतील अनुभव आहे.

जनसंपर्क, कामांचे नियोजन आणि सर्वसमावेशक राजकारण

१९९० ते १९९५ या पाच वर्षात गिरीश भाऊंनी जामनेर तालुका अक्षरशः पिंजून काढला. त्यावेळेस किमान पंचवीस तीस गावे अशी होती इथे एसटी जाऊ शकत नव्हती. ३०-४० गावे अशी होती की एक पाऊस पडला कि एसटी बंद असे ! छोटी छोटी कामे करून बारमाही एसटी सुरू होऊ शकणार्‍या कामांचे प्रस्ताव तयार करून खासदार गुणवंतराव सरोदे यांच्या स्थानिक विकास निधीच्या माध्यमातून सर्वात जास्त निधी जामनेर मतदार संघात गिरीश भाऊंनी खेचून आणला आणि १९९५ च्या आत किमान सात ते आठ गावांच्या दळणवळणाचा प्रश्‍न सोडवला. आमदार म्हणून निवडून यायच्या आधीच प्रत्यक्ष गावांच्या समस्या सोडवल्यामुळे एक काम करणारा आणि शब्द पाळणारा कार्यकर्ता अशी गिरीश भाऊंची प्रतिमा तयार झाली होती.

जामनेर तालुका अजिंठा डोंगराच्या पायथ्याशी. त्यामुळे लहान मोठ्या धरणांच्या, बंधार्‍यांच्या अनेक साईट्स उपलब्ध होत्या. तत्कालीन जलसंपदा मंत्री एकनाथराव खडसे आणि कार्यकारी अभियंता व्ही. डी. पाटील यांच्या सहकार्याने तालुक्यातील अनेक लहानमोठ्या प्रकल्पांना मंजुरी मिळून कामे सुरू झाली. कालांतराने ही कामे पूर्ण झाली आणि तालुका जलसमृद्ध झाला. शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढले, जमिनीचे दर वाढले, यासोबत रस्त्यांच्या प्रमुख समस्या जवळपास संपुष्टात आल्या आहेत. संपूर्ण मतदारसंघाचा कायापालट हळूहळू गेल्या तीस वर्षात झाला आहे. वैयक्तिक लाभाच्या कामासोबतच सार्वजनिक हिताची कामे मोठ्या प्रमाणावर मतदारसंघात बघायला मिळतात.

महाराष्ट्रात आज हमखास निवडून येण्याची क्षमता असणारे जे दहा-बारा उमेदवार असतील त्यात गिरीश महाजन यांचा समावेश नक्की करावा लागेल. फरक इतकाच की या निवडून येणार्‍या नेत्यांपैकी बरीचशी मंडळी ही प्रस्थापित घराण्यातील आहेत. व्यायामाची आवड, शुद्ध शाकाहारी भोजन, निर्व्यसनीपणा आणि शारीरिक तंदुरुस्ती च्या बाबतीत गिरीश भाऊंचा समावेश राज्यातील पहिल्या दोन-तीन नेत्यांमध्ये होईल. तालुक्यातून एक आमदार आणि जामनेर नगराध्यक्ष ही दोन पदं सोडलीत तर इतर सर्व पदांवर गिरीश भाऊंनी तालुक्यातील सर्व प्रमुख जाती धर्माच्या कार्यकर्त्यांना संधी दिली आहे. बेरजेचे राजकारण करणारा, सजग, अजिबात गाफील नसणारा असा हा नेता आहे.

गिरीश महाजन हे व्यक्ती म्हणून काही सद्गुणांचा पुतळा नव्हेत. परंतु आपल्या कार्याच्या बळावर त्यांनी आपली रेष इतकी मोठी आखली की त्यापेक्षा मोठी रेषा आखणारा आज तरी कोणी समोर दिसत नाही. मतदार संघातील जनतेने गिरीश भाऊंना त्यांच्या गुणदोषांसकट स्वीकारले आहे म्हणूनच गिरीश महाजन या व्यक्तीला निवडणुकीत पाडणे हे मुश्किल ही नहीं, नामुमकिन है असे आजचे चित्र आहे.

शासकीय कर्मचारी ६० नंतर निवृत्त होतो तर राजकीय क्षेत्रात ६० नंतर अनेकांचे करीअर सुरू होते. पण वय, अनुभव, फिटनेस, परफॉर्मन्स आणि पक्षातील सिनिअरिटी बघता गिरीशभाऊंचे भवितव्य खूप उज्वल आहे.
भाऊंना निरामय आणि संपन्न दीर्घायुष्याच्या मनापासून शुभेच्छा!

एम. एम. पाटील
उप अभियंता (स्वेच्छानिवृत्त)
जि. प. जळगाव

संपर्क क्रमांक : ८९७५७६९५३०

Protected Content