जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात वाढते तापमान, कॉंक्रिटीकरण आणि पर्यावरणातील बदलांमुळे भूजल पातळीत मोठ्या प्रमाणावर घट होत आहे. ही चिंताजनक घट भरून काढण्यासाठी जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या अभिनव संकल्पनेतून “मिशन संजीवनी” हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत एरंडोल तालुक्यातील गालापूर ग्रामपंचायत व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत रेन वॉटर हार्वेस्टिंगचे काम पूर्ण करण्यात आले असून, आज मंगळवार, २७ मे रोजी मीनल करनवाल यांनी स्वतः या कामाची पाहणी करून आवश्यक सूचना दिल्या.
जळगाव जिल्ह्यात दरवर्षी उन्हाळ्यात भूजल पातळी मोठ्या प्रमाणात घटल्याने नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. अनेक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो, तर विहिरी अधिग्रहित करूनही पाण्याची समस्या कायम राहते. यावर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेने ‘मिशन संजीवनी’ ही अभिनव संकल्पना अंमलात आणली आहे. या संकल्पनेनुसार, जिल्हा परिषद अंतर्गत विविध विभागांकडून ग्रामीण भागात लोकपयोगी इमारतींच्या बांधकामाला (उदा. प्राथमिक आरोग्य केंद्रे, शाळा, समाज मंदिरे, ग्रामपंचायत कार्यालये) मंजुरी देताना, संबंधित मक्तेदारांना स्वतःच्या खर्चाने इमारतींवर रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
श्रीमती करनवाल यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, एरंडोल तालुक्यातील गालापूर येथील ग्रामपंचायत कार्यालय आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत रेन वॉटर हार्वेस्टिंगचे काम पूर्ण झाले आहे. यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास सुरुवात झाली असून, भविष्यातील पाणीटंचाईच्या प्रश्नावर मात करण्यास मदत होणार आहे. या दौऱ्यात मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती करनवाल यांनी एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकाम सुरू असलेल्या इमारतीला भेट देऊन पाहणी केली, तसेच रिंगणगाव ग्रामपंचायत येथे भेट देत जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांचा आढावा घेतला. रिंगणगाव येथे सुरू असलेल्या घरकुल बांधकामांच्या कामांची पाहणी करून ती लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. यावेळी त्यांनी गावातील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटपही केले.