जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असलेल्या “जिल्हा परिषद आपल्या दारी” या लोकाभिमुख उपक्रमाअंतर्गत दुसरी तालुकास्तरीय तक्रार निवारण सभा आज मंगळवार, २७ मे रोजी एरंडोल पंचायत समिती येथे सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी स्वतः मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल उपस्थित होत्या.
यावेळी जिल्हा परिषद मुख्यालयातील सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. नागरिकांनी विविध विभागांशी संबंधित तक्रारी मांडल्या. सभेमध्ये एकूण १२ तक्रारी प्राप्त झाल्या, ज्यामध्ये ग्रामपंचायत प्रशासन, घरकुल योजना, पाणीपुरवठा, समाजकल्याण योजना तसेच इतर विभागांशी संबंधित समस्यांचा समावेश होता.
प्राप्त झालेल्या सर्व तक्रारींचे सखोलपणे परीक्षण करून, त्यावर जागेवरच उपाययोजना आणि निराकरण करण्यात आले. यामुळे उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केले. काही तक्रारींसाठी प्रत्यक्ष पाहणी करण्याची गरज भासल्याने, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ पाहणी करून आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
“जिल्हा परिषद आपल्या दारी” या उपक्रमातून शासन आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक सशक्त होत असून, नागरिकांच्या अडचणी थेट स्थानिक पातळीवर ऐकून, तत्काळ सोडविण्याचा एक सकारात्मक अनुभव यामार्फत मिळत आहे. हा उपक्रम नागरिकांसाठी एक प्रभावी व्यासपीठ ठरत आहे.