मुंबई प्रतिनिधी । जिल्हा शिवसेनेतील पदाधिकार्यांमध्ये खांदेपालट करण्यात आला असून विद्यमान जिल्हाध्यक्ष गुलाबराव वाघ यांना सहसंपर्क प्रमुखपदी बढती देण्यात आली असून जळगावचे माजी महापौर विष्णू भंगाळे व डॉ. हर्षल माने यांना जिल्हा प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
शिवसेनेतर्फे रात्री उशीरा जळगाव जिल्ह्यातील पदाधिकार्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. यात प्रदीर्घ काळापासून जिल्हाप्रमुख म्हणून काम पाहणारे गुलाबराव वाघ यांना जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी सहसंपर्क प्रमुख म्हणून प्रमोट करण्यात आले आहे.
दरम्यान, यासोबत जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी एक ऐवजी दोन जिल्हाध्यक्ष देण्यात आले आहेत. यात जळगावचे माजी महापौर विष्णू भंगाळे आणि जिल्हा परिषद सदस्य डॉ. हर्षल माने यांच्याकडे शिवसेना जिल्हाप्रमुखपद सोपविण्यात आले आहेत. यात विष्णू भंगाळे यांच्याकडे जळगाव शहर, जळगाव ग्रामीण आणि अमळनेर मतदारसंघ तर डॉ. हर्षल माने यांच्याकडे पाचोरा-भडगाव, चाळीसगाव, एरंडोल-पारोळा मतदारसंघांची जबाबदारी टाकण्यात आली आहे.
विष्णू भंगाळे यांच्या माध्यमातून शिवसेनेने लेवा पाटीदार समाजाला महत्वाच्या पदावर प्रतिनिधीत्व दिले आहे. जळगाव शहराच्या राजकारणात भंगाळे हे मातब्बर नेते म्हणून गणले जातात. आता जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी मिळाल्याने त्यांना शिवसेनेकडून पाठबळ मिळाले आहे. भंगाळे यांनी आधी देखील विधानसभेसाठी चाचपणी केली असली तरी ते प्रत्यक्षात निवडणुकीच्या रिंगणात उतरले नाहीत. आता मात्र ते यासाठी प्रयत्न करणार का ? याबाबत देखील उत्सुकतेचे वातावरण निर्मित झाले आहे.