एसटी कंडक्टरला मारहाण करणार्‍यास दोन वर्षे सक्तमजुरी

जळगाव प्रतिनिधी | तिकिटाच्या वादातून एसटीच्या वाहकाला मारहाण करून धमकावणार्‍याला न्यायालयाने दोन वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे.

याबाबत वृत्त असे की, २१ सप्टेबर २०१८ रोजी चाळीसगाव-मालेगाव बसमध्ये (एमएच- १९, बीटी- १३४२) तुळशीराम हरलाल राठोड (वय ६५, रा. विसापूर, ता. चाळीसगाव) हा इसम प्रवासासाठी बसला होता. या वेळी संबंधीत बसवरील कंडक्टर महेश देवचंद चव्हाण यांनी तिकिटासंदर्भात राठोडला विचारणा केली असता त्याने निम्मे तिकीट मागितले. परंतु, राठोडकडे निम्म्या तिकिटासाठी लागणारे कार्ड नव्हते. यामुळे पूर्ण तिकीट घ्यावे लागले असे चव्हाण यांनी राठोडला सांगितले. याचा राग आल्यामुळे राठोडाने धावत्या बसमध्ये पायातील चप्पल काढून वाहक चव्हाण यांना मारली. तसेच शिवीगाळ करत धमकावले होते.

या प्रकरणी चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राठोडच्या विरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या खटल्याची न्यायाधीश एस. एन. माने-गाडेकर यांच्या न्यायालयात खटल्याची सुनावणी झाली. यात सरकार पक्षाने एकूण ८ साक्षीदार तपासले. सरकार पक्षाने सादर केलेले पुरावे, युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरला. सुनावणीअंती न्यायालयाने राठोड याला दोषी धरून दोन वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंडाची शिक्षा शिक्षा ठोठावली. सरकारपक्षातर्फे ऍड. रमाकांत सोनवणे यांनी युक्तिवाद केला.

Protected Content