जळगाव प्रतिनिधी | शहरातील शनिपेठ भागात सकाळी चार वाजेच्या सुमारास दोन मजली इमारत कोसळली असून यात सुदैवाने प्राणहानी टळली असून मोठी वित्तहानी झाली आहे.
याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, पहाटे चार वाजेच्या सुमारास शनिपेठ भागातील १७ नंबर शाळेच्या समोरील इमारत अचानक कोसळली. ही इमारत नेमकी कशामुळे कोसळली याची माहिती मिळाली नाही. मात्र यात बारा जणांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले. तर यातील सात जण जखमी झाले आहेत. यात एका वृध्द महिलेस मोठ्या प्रमाणात दुखापत झाल्याने त्यांना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सामाजिक कार्यकर्ते कृणाल महाजन यांनी तातडीने धाव घेऊन मदतकार्य केले.
या संदर्भात परिसरातील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार याच इमारतीच्या बाजूला अलीकडेच एका नव्या इमारतीची बांधकाम सुरू करण्यात आले असून यासाठी परवानगी घेण्यात आलेली नाही. या विना परवानगी इमारतीच्या कामामुळेच ही दोन मजली इमारत कोसळल्याचा आरोप करण्यात येत आहे. या संदर्भात शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत पोलीसात नोंद झाली नव्हती. या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी परिसरातून होत आहे.