जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्यातील कलावंतांनी पांढरे निशाण फडकावत आज शांततेचा संदेश दिला असून यात जळगावातील कलावंतांनीही सहभाग घेतला.
आज महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून जळगावातील कलावंतांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ पांढरे निशाण फडकावत प्रतिकात्मक पध्दतीत शांततेचा संदेश दिला. शांतता, मैत्री, प्रेम आणि संवाद यावर विश्वास असणार्या लेखक, कवी, कलावंत, सामाजिक कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ जमून महाराष्ट्र दिनी शांततेच्या मार्गाने पांढरे कपडे परिधान करून वा पांढरे निशाण दाखवून प्रेम व शांततेच आवाहन केलं .
आज राज्यभरात हे अभिनव आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी प्रसिध्द कवी अशोक कोतवाल, जेष्ठ रंगकर्मी शंभू पाटील, चित्रकार राजू बाविस्कर, विजय जैन, जितेंद्र सुरळकर, नितीन सोनवणे, गायिका सुदीप्ता सरकार, सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा शिंदे, डॉ रफीक काझी, प्रा. सत्यजित साळवे, सुनील पाटील, जेष्ठ अभिनेत्री मंजुषा भिडे, अंजली पाटील, उदय सपकाळे, हरिश्चंद्र सोनवणे, श्रीकांत पाटील, आकाश बाविस्कर, राहूल निंबाळकर, धनजंय पाटील, केतन सोनार , संदिप झाल्टे, सोनाली पाटील , हर्षल पाटील, जगदीश बियाणी आदी उपस्थित होते.
याप्रसंगी सर्वांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ उभे राहून पांढरे निशाण दाखवून आपली भूमिका स्पष्ट केली. याप्रसंगी कलावंतांसह सर्वांनी शांततेच्या मार्गाने ’द्वेष आणि दुहीचं विषारी राजकारण आम्हाला अमान्य असून आम्ही लेखक, कलावंत, कार्यकर्ते आणि जबाबदार नागरिक शांततेच्या मार्गाने आमची अस्वस्थता दाखवत आहोत आणि संवादाने प्रश्न सुटू शकतात यावर भर देत आहोत.’ ही भूमिका कृतीतून व्यक्त केली.