सुरेशदादा समर्थकांचा ‘ॲक्शन मोड’ : सत्ता संग्रामाचा तिसरा कोन !

जळगाव राहूल शिरसाळे/सचिन गोसावी | माजी महापौर नितीन लढ्ढा यांच्या संपर्क कार्यालयातून निर्माण झालेली सक्रियता ही महापालिकेतील सुरेशदादा जैन समर्थकांमधील एक ‘इंटरेस्टींग मुव्हमेंट’ दर्शविणारी ठरली आहे. बदलत्या राजकीय स्थितीत विष्णू भंगाळे आणि सुनील महाजन यांच्या राजकीय आकांक्षा पल्लवीत झाल्या असतांना लढ्ढा यांनी शिवसेनेची कोणतीही आयडेंटीटी न लावता आपल्या संपर्क कार्यालयाच्या उदघाटनाला सर्वपक्षीय राजकीय मित्र जमवून इच्छुकांना योग्य तो संदेश दिला आहे. महापालिकेतील सत्ताधार्‍यांमध्ये सारेच काही आलबेल नसतांना नितीनभाऊंचा हा पवित्रा आकस्मीक नव्हे तर आगामी काळातील राजकीय वार्‍याची दिशा दर्शवणारा असू शकतो. जळगाव महानगर शिवसेनेतील संघर्षाबाबतचे आमचे हे विशेष राजकीय विश्‍लेषण…

आज माजी महापौर नितीन लढ्ढा यांच्या संपर्क कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले. महापौर सौ. जयश्री सुनील महाजन यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत हे कार्यालय सुरू करण्यात आले. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील आज जिल्ह्यातच असतांना महापौरांच्या हस्ते करण्यात आलेले उदघाटन हे लक्षणीय ठरले. याहून दखल घेण्याजोगी बाब म्हणजे उदघाटनपर कार्यक्रमाच्या फलकावर फक्त सुरेशदादा जैन यांची प्रतिमा प्रेरणास्थान म्हणून लावलेली होती. तर संपर्क कार्यालयाच्या फलकावर देखील नितीन लढ्ढा यांच्या दुसर्‍या टोकाला सुरेशदादा जैन यांची प्रतिमा लावण्यात आल्याचे दिसून आले आहे. एकवेळेस प्रभागातील जनतेसाठी सुरू करण्यात आलेले हे संपर्क कार्यालय खासगी असले तरी यावर सुरेशदादा जैन यांचे कट्टर समर्थक ही ओळख अधिक ठळकपणे अधोरेखीत करण्यात आल्याचे दिसून आले आहे. यामागील काही कारणे समजून घेण्यासाठी महानगर शिवसेनेतील खदखद आधी जाणून घ्यावी लागेल.

गेल्या अडीच वर्षात शिवसेना पक्ष हा विरोधात असतांना नितीन लढ्ढा यांनी अनेकदा अतिशय अभ्यासूपणे सत्ताधार्‍यांना कोंडीत पकडण्याचे काम केले होते. तर यासोबत प्रशांत नाईक व अनंत उर्फ बंटी जोशी यांनी विविध आंदोलनांच्या माध्यमातून सत्ताधार्‍यांनी जेरीस आणले होते. या दोन्ही नगरसेवकांना आक्रमकपणा हा विरोधात असतांना अजूनच उजळून निघाला होता. यानंतर प्रचंड गतीमान घडामोेडी होऊन मार्च महिन्याच्या अखेरीस झालेल्या महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीत अकस्मातपणे भाजपमध्ये उभी फूट पडून शिवसेनेला सत्ता मिळाली. शिवसेनेच्या मूळ सदस्यांना भाजपमधून फुटून निघालेल्या गटाची जोड मिळाली. महापालिकेत भक्कम बहुमत घेऊन शिवसेनेचा भगवा फडकला. राज्यात सत्ता आणि सोबत नगरविकासमंत्री आणि पालकमंत्रीपद शिवसेनेकडे असल्याने शहरात विकासाचे नवीन पर्व सुरू होण्याची अपेक्षा नागरिकांना होती. या दिशेने पावले देखील उचलण्यात आली आहेत. विशेष करून पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी जळगावच्या विकासासाठी तब्बल ६१ कोटी रूपयांचा निधी मंजूर करून कामांना गती दिली आहे. एकीकडे निधी मिळत असतांना महानगर शिवसेनेतील असंतोष उफाळून आल्याचे दिसून आले आहे.

शिवसेनेत आधीच मूळचे शिवसैनिक आणि सुरेशदादा समर्थक असे दोन गट होते. याला भाजपमधून आलेल्यांची जोड मिळाल्याने तीन गट झाले. जसे गट झाले तशीच नेत्यांचीही विभागणी झाली. माजी महापौर विष्णू भंगाळे व महानगराध्यक्ष शरद तायडे हे पालकमंत्र्यांच्या गटात; महापौर आणि त्यांचे पती सावध भूमिकेत तर भाजपमधून आलेले थेट ना. एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असे हे त्रांगडे उभे राहिले. यातून विष्णू भंगाळे यांना शिवसेना जिल्हाप्रमुखपदाची संधी मिळाली. यामुळे ते पालकमंत्र्यांच्या अधिक जवळ गेले. तर महाजन दाम्पत्याने मध्यंतरी एकनाथराव खडसे यांच्या निवासस्थानी लावलेली हजेरी ही अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरली. सुनील महाजन आणि विष्णू भंगाळे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीची चाचपणी सुरू केल्याचे त्यांचे समर्थक सांगू लागले. या गदारोळात सुरेशदादा जैन यांच्या कारकिर्दीच्या उत्तरार्धातील ‘वजीर’ म्हणून मोठी भूमिका निभावणारे नितीन लढ्ढा (त्यांच्या स्वभावानुसार !) शांत होते. दरम्यान, आधी भाजपच्या सत्ताधार्‍यांवर तुटून पडणारे अनंत जोशी हे आपले काम कुणी ऐकत नाही असे सांगत सागर पार्कवर स्वत: फावडे हातात घेऊन तण काढतांना दिसले. तर शिवसेनेचेच दुसरे फायरब्रँड नगरसेवक प्रशांत नाईक हे देखील तितके सक्रीय दिसत नाहीत.

या पार्श्‍वभूमिवर, लढ्ढा यांनी मात्र अगदी हळूच जोरदार धक्का दिल्याचे दिसून आले. त्यांनी सुरेशदादा जैन यांच्या समर्थनाचा शिक्का गडद करत संपर्क कार्यालय सुरू केले. यात सुरेशदादांनी स्मार्टफोनवरून शुभेच्छा देखील दिल्या. यामुळे आजवर थोडा बचावात्मक पवित्र्यात असणारा सुरेशदादा जैन यांचा गट हा अधिक आक्रमकपणे वाटचाल करू शकतो. यात महापालिकेत तूर्तास ढवळाढवळ करता येणार नसली तरी आगामी विधानसभा निवडणुकीत विष्णू भंगाळे वा सुनील महाजन यांचा क्लेम येईल त्या आधीच दादा गटाकडून लढ्ढा यांच्यासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. अजून यासाठी खूप वेळ असला तरी सुनील महाजन आणि विष्णू भंगाळे यांना योग्य तो संदेश देण्यासाठी लढ्ढांचे संपर्क कार्यालय सुरू झाल्याचे स्पष्ट आहे.

विशेष म्हणजे ‘महापौर कक्षा’च्या माध्यमातून जयश्री महाजन या जनतेच्या समस्यांचे निराकरण करत असतांना खुद्द नितीन लढ्ढा यांनी आज पत्रकारांशी बोलतांना कुणीही आपल्या कार्यालयात महापालिकेच्या समस्या घेऊन येऊ शकतो हे सांगून योग्य संदेश दिला आहे. यामुळे लढ्ढांचे संपर्क कार्यालय हे ‘महापौर मदत कक्षा’प्रमाणेच काम करणार असल्याचे त्यांनीच सांगून टाकले आहे. एका अर्थाने गेल्या काही वर्षांपासून सावध पवित्र्यात असणारे सुरेशदादा जैन यांचे समर्थक आगामी निवडणुकीसाठी वार्म अप करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. याला शिवसेनेतील शह-काटशहाच्या राजकारणाची फोडणी मिळाली असून ती शहराच्या आगामी राजकारणावर दूरगामी परिणाम करणारी असेल असे आजच दिसून येत आहे.

खालील व्हिडीओत नितीन लढ्ढा यांनी पत्रकारांशी साधलेला संवाद आपण पाहू शकतात.

https://www.facebook.com/508992935887325/videos/876744036552552

Protected Content