अनिल परब हेच शिवसेनेचे गद्दार ! : रामदास कदम यांचा हल्लाबोल

मुंबई प्रतिनिधी | परिवहन मंत्री अनिल परब यांनी शिवसेना गहाण ठेवली असून तेच शिवसेनेचे गद्दार असल्याची घणाघाती टीका माजी विधानपरिषद विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनी केली आहे. आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी परब यांच्यावर टिकास्त्र सोडल्याने शिवसेनेतील अंतर्गत कलह समोर आला आहे.

काही दिवसांपूर्वी एका कथित ऑडिओ क्लीपच्या माध्यमातून शिवसेनेतील अंतर्गत कलह समोर आला होता. यात रामदास कदम यांनी अनिल परब यांच्या विरोधातील पुरावे भाजप नेते किरीट सोमय्या यांना सुपुर्द केल्याचा दावा करण्यात आला होता. परब यांचा रिसॉर्ट पाडण्यासाठी कदम हे भाजप नेते किरीट सोमय्या यांना मदत करत असल्याचं दिसून येत असल्याने यामुळे खळबळ उडाली होती. त्यावर रामदास कदम यांनी स्पष्टीकरण देताना ही क्लिप आपली नसून कुणाचं तरी हे षडयंत्र असल्याचा दावा केला होता.

दरम्यान, यानंतर शिवसेनेने रामदास कदम यांना विधान परिषदेचं तिकीट नाकारलं होतं. त्यांच्या ऐवजी सुनील शिंदे यांना विधान परिषदेचं तिकीट देण्यात आलं होते. तर दोन दिवसांपूर्वीच दोन दिवसांपूर्वीच शिवसेनेने रत्नागिरीतील शिवसेना पदाधिकार्‍यांच्या नियुक्त्या करतांना कदम समर्थकांना डावलण्यात आलं. कदम यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. या पार्श्‍वभूमिवर, आज रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेऊन अनिल परब यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

या पत्रकार परिषदेत रामदास कदम म्हणाले की, अनिल परब हे उध्दव ठाकरे यांची दिशाभूल करत आहेत. परब हे माझ्या मुलांची राजकीय कारकिर्द संपविण्याचा प्रयत्न करत आहेत. परब यांनी शिवसेनेला गहाण ठेवले आहे. ते राष्ट्रवादीला उघडपणे मदत करत आहेत. एसटीचा संप सुरू असतांनाही अनिल परब यांनी याबाबत चर्चा करण्याऐवजी कदम यांच्या मुलांना संपविण्यासाठी दापोली येथे बसून असल्याची बाब अतिशय दुर्दैवी असल्याचा आरोप त्यांनी केला. बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन सांगतो की मी किरीट सोमय्या यांची भेट घेतलेली नाही. त्यांचे थोबाड सुध्दा पाहण्याची माझी इच्छा नाही. असे असतांनाही परब यांचे मत हेच उध्दव ठाकरे यांचे मत आहे का ? हे आपण जाणून घेणार आहोत. यानंतरच आपण पुढील दिशा ठरवणार आहोत. आपण शिवसेना सोडणार नसलो तरी मुले त्यांचा निर्णय घेण्यासाठी मोकळे असल्याचे त्यांनी सूचकपणे सांगितले. तसेच त्यांनी याप्रसंगी उदय सामंत यांच्यावर देखील टीका केली.

Protected Content