काय सांगता…? : आता चक्क शिवसेना, भाजप फुटीर गट व एमआयएमची आघाडी !

जळगाव प्रतिनिधी । जे कधी घडू शकत नाही ते राज्यातील महाविकास आघाडीच्या तीन पक्षांची एकत्र येऊन दाखविले. तर याच्याही पुढचा पल्ला जळगाव महापालिकेत घडणार असून येथे शिवसेना, भाजपचा फुटीर गट आणि एमआयएम एकत्रीतपणे सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. अर्थात, जळगावच्या अनोख्या आघाडीचा हा पॅटर्न आता राज्यभरात चर्चेचा विषय बनणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

राज्यातील महाविकास आघाडीत शिवसेना हा कट्टर हिंदूत्ववादी तर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे त्यांच्या कट्टर विरोधी म्हणजे पुरोगामी विचासरणीचे पक्ष एकत्र आले आणि इतिहास घडला. आज सुमारे दीड वर्षांपासून महाविकास आघाडीचा संसार सुरू आहे. यात अनेकदा कुरबुरी घडत असल्या तरी महाविकास आघाडीने पक्की मांड ठोकत कारभार सुरू केल्याचे आजचे चित्र आहे.

राज्यात अनेक ठिकाणी महाविकास आघाडीचा पॅटर्न राबविण्यात आला आहे. यात परस्परविरोधी विचारधारांचे सदस्य एकत्र येत आहेत. यात अलीकडेच अमरावती महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या सदस्याने एमआयएमच्या उमेदवाराला केलेले मतदान हे चर्चेचा विषय ठरले. यामुळे उडालेली खळबळ शांत होत नाही तोच आता जळगाव महापालिकेत याच्या पुढील अध्याय घडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जळगाव महापालिकेत भाजपला तब्बल ५७ जागा मिळाल्या असून या खालोखाल शिवसेनेला १५ तर एमआयएमला तीन जागा मिळाल्या होत्या. आता १८ मार्च रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीत शिवसेनेने चतुर खेळी करून भाजपमधील एका मोठ्या गटाला गळास लावले आहे. तर, एमआयएम देखील आमच्या सोबत असल्याचा दावा आज माजी महापौर नितीन लढ्ढा यांनी केला आहे. यामुळे आता महापालिकेत शिवसेना, भाजपचा फुटीर गट आणि एमआयएम अशी नवीन आघाडी आकारास येत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आता १८ मार्च रोजी भाजप विरूध्द शिवसेना, भाजपचा फुटीर गट आणि एमआयएम या दोन आघाड्यांमध्ये लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यात शिवसेनेने सावधगिरी म्हणून आपल्या सदस्यांसह फुटी गटाला सहलीवर पाठविले आहे. तर, भाजपचे नेते देखील कसलेले असल्यामुळे ते सहजासहजी सत्ता सोडणार नसल्याची बाबही दुर्लक्ष करण्याजोगी नाही. यामुळे आता १८ मार्च रोजी नवीन आघाडी बाजी मारणार की भाजप सत्ता कायम राखणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

वरील बातमीशी संबंधीत हा व्हिडीओ अवश्य पहा

शिवसेनेचा भाजपला चेकमेट : माजी महापौर नितीन लढ्ढा यांनी दिलेली माहिती !

https://www.facebook.com/508992935887325/videos/428369584934984

Protected Content