जळगावकर उन्हाने हैराण; दिवसा रस्त्यांवर शुकशुकाट, रात्री उकळ्यांनी त्रस्त

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात उन्हाचा पारा चांगलाच वाढला असून, नागरिक यामुळे हैराण झाले आहेत. तापमानाने चाळीशीचा आकडा ओलांडल्याने सकाळपासून रात्रीपर्यंत उकाड्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. याचा परिणाम शहरातील दैनंदिन व्यवहारावरही दिसून येत आहे.

दुपारच्या वेळी जळगावातील मुख्य रस्त्यांवर शुकशुकाट जाणवत आहे. नागरिक तीव्र उन्हामुळे घराबाहेर पडणे टाळत आहेत. याचा फटका जिल्ह्यातील अनेक व्यवसायिकांना बसत आहे. दुपारच्या वेळी ग्राहक नसल्याने त्यांची विक्री घटली आहे. उन्हाळ्याच्या या तीव्रतेमुळे रात्रीच्या वेळीही उकळ्या जाणवत आहेत, ज्यामुळे नागरिकांना झोप घेणेही कठीण झाले आहे. यामुळे शहरातील कुलर आणि एसीला मोठी मागणी वाढली आहे. अनेकजण उष्णतेपासून बचाव करण्यासाठी या उपकरणांचा आधार घेत आहेत.

जिल्ह्यातील वाढत्या तापमानाची दखल घेत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी विशेषतः घरातील गर्भवती महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांची अधिक काळजी घेण्यास सांगितले आहे. तसेच, उन्हाळ्यात शरीराला पाण्याची कमतरता भासू नये यासाठी योग्य उपाययोजना करण्याचे आणि आरोग्य जपण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

Protected Content