चहाच्या टपरीस लागली आग; सुदैवाने मोठा अनर्थ टळला !

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पाचोरा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या राजेंद्र प्रसाद रोडवरील चहाच्या टपरीला लागलेल्या आगीने एकच खळबळ उडवून दिली. ही घटना ७ एप्रिल रोजी दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास घडली. गॅस सिलिंडर जोडत असताना अचानक भडका उडाल्याने ही आग लागली असून, यात एक इसम किरकोळ भाजला गेला आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

देशमुखवाडी येथील ७० वर्षीय वृद्ध महिला दगुबाई विठ्ठल महाजन या राजेंद्र प्रसाद रोडवरील प्रकाश टॉकीज समोर आपल्या उपजीविकेसाठी चहाची टपरी चालवत होत्या. त्याचवेळी त्यांनी गॅस सिलिंडर जोडण्यासाठी समोरच राहणाऱ्या दिपक चतुर्भुज शर्मा यांना बोलावले. गॅस जोडणीच्या प्रक्रियेदरम्यान अचानक गॅसचा भडका उडाल्याने टपरीला आग लागली.

दगुबाई महाजन प्रसंगावधान राखत घटनास्थळावरून दूर गेल्याने त्यांना कोणतीही इजा झाली नाही. मात्र, दिपक शर्मा यांचा डावा हात व गाल भाजला असून, त्यांना तात्काळ वैद्यकीय मदतीसाठी हलवण्यात आले आहे.

आग लागल्यानंतर परिसरातील नागरिकांनी तत्परतेने मदत करत आग आटोक्यात आणली. जवळच सिनेमा थिएटर व व्यापारी दुकाने असल्याने मोठा अनर्थ टळला आहे. मात्र, दगुबाई यांची चहाची टपरी पूर्णतः जळून खाक झाली आहे, ज्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक प्रशासनाकडून पंचनामा करण्यात येणार असून, नागरिकांनी अशा ठिकाणी सुरक्षा उपायांची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Protected Content