ब्रेकींग : जिल्ह्यातील सहा नगरपालिकांच्या आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्ह्यातील नऊ नगरपालिकांच्या निवडणूक कार्यक्रमाला स्थगिती आली असतांनाच आता दुसर्‍या टप्प्यातील उर्वरित सहा नगरपालिकांच्या आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे.

जळगाव जिल्ह्यातील नगरपालिकांच्या निवडणुका दोन टप्प्यात होणार असल्याचे आधीच जाहीर करण्यात आले आहे. यात पहिल्या टप्प्यातील नऊ नगरपालिकांच्या निवडणुकीची अधिसूचना आधीच जाहीर करण्यात आली होती. यात १८ ऑगस्ट २०२२ रोजी मतदान तर १९ ऑगस्ट रोजी मतमोजणी होणार होती. तथापि, सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षणाबाबत आदेश देतांना पंधरा दिवसात नव्याने निवडणुका जाहीर करण्याचे निर्देश दिलेत. यामुळे त्या निवडणुका स्थगित झाल्या आहेत. यात जिल्ह्यातील भुसावळ, चाळीसगाव, अमळनेर, एरंडोल, पारोळा, धरणगाव, वरणगाव, यावल, फैजपूर या नऊ नगरपालिकांचा समावेश होता.

दरम्यान, जिल्ह्यात पाचोरा, भडगाव, चोपडा, रावेर, सावदा आणि नव्यानेच अस्तित्वात आलेल्या नशिराबाद अशा एकूण सहा नगरपालिकांची निवडणूक दुसर्‍या टप्यात होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. आता याच सहाही नगरपालिकांच्या आरक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यानुसार, सदस्य पदांच्या आरक्षणाची नोटीस २६ जुलै रोजी जिल्हाधिकारी प्रसिध्द करणार आहेत. तर प्रत्येक नगरपालिकांमधील मुख्याधिकार्‍यांच्या उपस्थितीत गुरूवार २८ जुलै रोजी प्रत्यक्ष आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. यात एस. सी.; एस. टी., ओबीसी आणि महिला अशा प्रकारात आरक्षण काढण्यात येईल.

दिनांक २९ जुलै ते १ ऑगस्टच्या दरम्यान आरक्षणावर हरकती मागविण्यात येणार आहेत. ४ ऑगस्ट रोजी विभागीय आयुक्त याला मान्यता देतील. तर ५ ऑगस्ट २०२२ रोजी या आरक्षणाची माहिती जिल्हाधिकारी ही अधिकृतपणे जाहीर करून जिल्हाधिकारी कार्यालय आणि नगरपालिकांच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करतील असे या आरक्षण कार्यक्रमात नमूद करण्यात आले आहे.

जिल्ह्याचा विचार करता, या टप्प्यातील सहा नगरपालिकांपैकी चोपडा आणि पाचोरा या ब वर्गातील तर उर्वरित चारही क वर्गातील नगरपालिका आहेत. यातील भडगाव नगरपालिकेची मुदत ही २९ एप्रिल २०२०; पाचोरा, चोपडा, रावेर आणि सावदा नगरपालिकांच्या मुदती २९ डिसेंबर २०२१ रोजी संपलेल्या आहेत. तर नशिराबादला नव्यानेच निवडणुका होणार आहेत. या पार्श्‍वभूमिवर, आता आरक्षणाच्या सोडतीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

%d bloggers like this: