कोविडच्या खर्चाची त्रयस्थ संस्थेतर्फे चौकशी करा : रोहिणी खडसे

जळगाव प्रतिनिधी | जिल्ह्यात वार्षिक योजनेंतर्गत कोरोना उपाययोजनांसाठी खर्च करण्यात आलेल्या ४४ कोटी रुपयांच्या अनुपालन अहवालाबाबत नियोजन समितीच्या सदस्या रोहिणी खडसे यांनी आक्षेप नोंदवून याची त्रयस्थ संस्थेतर्फे चौकशी करण्याची मागणी केली आहे.

नियोजन समितीच्या ३० ऑगस्ट २०२१ रोजी झालेल्या बैठकीत विषय क्रमांक ४ नुसार ४४ कोटी रुपये खर्चास कार्योत्तर मंजुर देण्याचा विषय मंजूर करण्यात आला. या बैठकीचे इतिवृत्त १३ जानेवारीच्या सभेत मंजुरीसाठी ठेवले होते. दरम्यान, ४४ कोटी रुपयांच्या निधी खर्चाबाबत सादर केलेल्या अनुपालन अहवालामध्ये मोठ्या प्रमाणावर संदिग्धता असल्याचे ऍड. रोहिणी खडसे यांनी पालकमंत्र्यांना दिलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे.

या संदर्भातील पत्रात रोहिणी खडसे यांनी नमूद केले आहे की, नियोजन समितीच्या बहुतांश सदस्यांनी ४४ कोटी रुपयांचा विषय क्रमांक ४ ला स्पष्ट विरोध केला आहे. या प्रकरणाची संपूर्ण चौकशी होईपर्यंत हा विषय स्थगित ठेवण्यात यावा. ३० ऑगस्ट २०२१ च्या सभेतील इतिवृत्त मंजुरीस माझा स्पष्ट विरोध नोंदवण्यात यावा, यातून निर्माण होणार्‍या कोणत्याही बेकायदेशीर बाबीसाठी मी जबाबदार राहणार नसल्याचे रोहिणी खडसे यांनी या पत्रात म्हटले आहे.

दरमत्यान, अनुपालन अहवालामध्ये शल्य चिकित्सकांनी काही बाबींचा खुलासा केला आहे; परंतु अनेक बाबी त्यांच्याशीच संबंधित असल्याने ते चौकशी करू शकत नाहीत. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी शासनाच्या विशेष लेखापरीक्षकामार्फत किंवा त्रयस्थ संस्थेमार्फत करावी, अशी मागणी देखील रोहिणी खडसे यांनी या पत्राच्या माध्यमातून केली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.