मू. जे. महाविद्यालयात ‘गीता जयंती’ निमित्य जाहीर व्याख्यान

जळगाव प्रतिनिधी । मू. जे. महाविद्यालयाच्या सोहम् डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी द्वारा ‘गीता जयंती’ निमित्त जाहीर व्याख्यानाचे आयोजन शुक्रवार दि. २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता करण्यात आले होते. या कार्यक्रमात ह. भ. प. रमेशपंत खेरडे महाराज (चांदूर रेल्वे) यांनी “श्रीमद् भगवदगीतेतील योग आणि मानवी मूल्ये” या विषयावर ऑनलाईन उद्बोधन केले.

कायकर्माची सुरवात प्रा. पंकज खाजबागे यांनी ओंकार प्रार्थनेने केली. प्रास्ताविकातून सोहम् डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथीचे संचालक डॉ. देवानंद सोनार यांनी गीता जयंती आणि मोक्षदा एकादशीचे महत्व पटवून देत, योग निसर्गोपचार क्षेत्रातील विभागाच्या कार्याविषयी माहिती दिली आणि ह. भ. प. श्री रमेशपंत खेरडे महाराज यांचा परिचय तसेच कार्यक्रमाचे औचित्य पटवून दिले.

ह.भ. प. रमेशपंत खेरडे महाराज यांनी गीतेतील योगाचे स्वरूप पटवून दिले तसेच गीता हा योगाचा महान ग्रंथ असून गीतेतील प्रत्येक अध्यायाला योग म्हणून संबोधले गेले आहे असा उल्लेखही त्यांनी आपल्या व्याख्यानातुन केला. वेदातील ज्ञान, कर्म आणि उपासना कांड गीतमध्ये सामावले असल्याचा उल्लेखही त्यांनी केला. मानवतेचा संदेश देणारी गीता मानवी मूल्ये विकसित करण्यासाठी आजही निःसंशय उपयुक्तच आहे, गीता सर्वानाच प्रेरणा देणारी आहे, आपापल्या बुद्धी सामर्थ्याने आपण गीतेतून प्रेरणा घेऊन आदर्श जीवन जगावे असा मोलाचा सल्ला त्यांनी याप्रसंगी आपल्या व्याख्यानातून दिला. कार्यक्रमाची सांगता शांतीपाठ करून करण्यात आली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी के. सी. ई. सोसायटीचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सं. ना. भारंबे यांचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन आणि आभार प्रा. पंकज खाजबागे यांनी व्यक्त केले. निसर्गोपचार तज्ञ समन्वयक प्रा. अनंत महाजन, प्रा. सोनल महाजन, योग- निसर्गोपचार विभागातील प्राध्यापक, विद्यार्थी यांचे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य लाभले. योग निसर्गोपचार प्रेमी साधक बी. ए., एम. ए. योगिक सायन्स तसेच योग निसर्गोपचार प्रमाणपत्र व पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात सहभाग नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढविली.

Protected Content