जम्मू-काश्मीरमधील ‘आयुष्मान भारत पंतप्रधान-जन आरोग्य योजनेचं उद्घाटन

 

 

नवी दिल्ली : : वृत्तसंस्था| पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी जम्मू-काश्मीरमधील ‘आयुष्मान भारत पंतप्रधान-जन आरोग्य योजनेचं उद्घाटन केलं. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ते या सोहळ्यात उपस्थित झाले होते.

पंतप्रधान मोदींच्यावतीने जम्मू-काश्मीरचे उप-राज्यपाल मनोज सिन्हा यांनी केंद्रशासित प्रदेशातील लाभार्थ्यांना आरोग्य योजनेचं ई-कार्ड वाटप केलं. या कार्यक्रमाला गृहमंत्री अमित शहांनी देखील डिजिटल माध्यमातून हजेरी लावली. ते सध्या आसाम-मणिपूरच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत.

‘जम्मू-काश्मीरसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. जम्मू-काश्मीरमधील अगदी तळागाळातल्या नागरिकांच्या आरोग्याची काळजी या योजनेद्वारे घेण्यात येणार आहे. १५ लाख कुटुंबांना पाच लाखांपर्यंत सर्व आरोग्य सुविधा मोफत मिळतील. काश्मिरी बंधू-भगिनींसाठी ही योजना आजपासून सुरू केली जात आहे’ असं यावेळी गृहमंत्र्यांनी म्हटलं.

जिल्हा विकास परिषद निवडणुकीच्या माध्यमातून जम्मू काश्मीरनं एक नवा अध्याय लिहिल्याचं पंतप्रधान मोदींनी म्हटलंय. जम्मू-काश्मीरमधील प्रत्येक मतदाराच्या चेहऱ्यावर मला विकासाची आशा दिसली. या निवडणुकांमध्ये जम्मू-काश्मीरच्या नागरिकांनी लोकशाहीची मुळं आणखीन मजबूत करण्याचं काम केल्यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं.

जम्मू-काश्मीरमधील प्रत्येक मतदारांच्या नजरेत भूतकाळ मागे पडलेला दिसतोय, उज्ज्वल भविष्याचा विश्वासही त्यांच्या नजरेतून दिसून येतोय. डीडीसी निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यात कोरोना संक्रमण आणि प्रचंड थंडी असूनही तरुण, वृद्ध, स्त्रिया बुथपर्यंत पोहोचल्याचं पाहायला मिळालं. लोकशाही मजबूत करण्यासाठी मी नागरिकांचे आभार मानतो, असंही पंतप्रधानांनी म्हटलं.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत जम्मू-काश्मीरमध्ये १० लाखांहून अधिक शौचालये बांधली गेली. याचा हेतू लोकांचं आरोग्य सुधारावं हा देखील आहे. जम्मू-काश्मीरमध्ये जवळपास ३००० हून अधिक डॉक्टर १४००० हून अधिक पॅरामेडिकल कर्मचारी, आशा कामगार रात्रंदिवस काम करत आहेत आणि अजूनही कार्यरत आहेत, असंही यावेळी पंतप्रधानांनी नमूद केलं.

Protected Content